‘मातोश्री’वर आंदोलन करणारे मुख्यमंत्र्यांचे भाडोत्री सुपारीबाज! संजय राऊत यांनी मिंध्यांसोबतचे फोटो झळकावत बुरखाच फाडला

वक्फ बोर्ड विधेयक दुरुस्तीबाबत संसदेत चर्चाही झाली नसताना केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठी मिंधे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील सुपारीबाज भाडोत्री लोकांनी ‘मातोश्री’बाहेर आंदोलन केल्याचा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. या आंदोलकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटोच त्यांनी पत्रकार परिषदेत नावासह झळकवत मिंध्यांच्या कारस्थानाचा बुरखाच फाडला.

वक्फ बोर्ड विधेयकातील सुधारणांबाबत केंद्रीय स्तरावर नुकतीच कार्यवाही सुरू झाली आहे. याचे राजकारण करीत मिंध्यांच्या कारस्थानाने काही मुस्लिमांनी नुकतेच ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करीत शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली. मिंध्यांचा हा सुपारीचा खेळ असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. या विधेयकाबाबत पार्लमेंटमध्ये चर्चा होणेही बाकी आहे. सध्या हे विधेयक सर्व पक्षांचे सदस्य असलेल्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले आहे. या ठिकाणी सर्व पक्षांच्या सदस्यांना आपली बाजू मांडण्याची संधी आहे. असे असताना बेईमान मिंधे गटाने मुंबई-महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्यासाठी ‘मातोश्री’वर मुस्लिम गटाचे लोक पाठवल्याचेही ते म्हणाले. ठाण्यात भगवा सप्ताह कार्यक्रमप्रसंगी काळोखातून फेकाफेकी करणारे लोक बाहेरून आणलेले सुपारीबाज होते असे सांगताना, सत्तेचा माज दाखवू नका, असेही त्यांनी बजावले.

असा केला पर्दाफाश
मिंध्यांच्या पेरोलवर असणाऱ्या आंदोलक-घोषणाबाजांमधील सलमान शेख, अफराक सिद्दीकी, इलियाज शेख, अक्रम शेख, इम्रान शेख, अकबर सय्यद यांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटोच संजय राऊत यांनी झळकवले. आंदोलक झिशान चौधरी तर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबत होता. त्यामुळे संपूर्ण फॅमिलीच सुपारीबाज असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. ‘वर्षा’वरून चालतात सुपारी गँग सध्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आणि ठाण्यातून सुपारी गँग चालवल्या जातात, असेही संजय राऊत म्हणाले. यातूनच ‘मातोश्री’बाहेर दहा-वीस लोकांनी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम जनता सध्या महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. तर ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करणारे मुस्लिम मिंध्यांच्या पेरोलवरील असल्याचेही ते म्हणाले.