लाडक्या बहिणीचे 1500 रुपये काढून घेऊ! रवी राणा यांची धमकी

आगामी विधानसभा निवडणुकीत मलाच मते द्या, नाहीतर तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये काढून घेईन, अशी धमकी आमदार रवी राणा यांनी आज दिली. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना लाभार्थी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. त्यावरून राणा यांच्यावर टीका होत आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दिवाळीनंतर ते तीन हजार रुपये व्हायला हवेत आणि मी विनंती केली तर तो आकडा तीन हजार रुपये होऊ शकतो. फक्त तुम्ही येत्या निवडणुकीत तुमच्या या भावाला मतरूपी आशीर्वाद द्या, असे आवाहनही राणा यांनी केले. महायुती सरकारने सगळ्यांना खूप काही दिले आहे, त्याला सर्वांनी जागायला हवे, असेही ते म्हणाले.

सरकारी पैसा रवी राणा,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे काय? – वडेट्टीवार

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना निवडणुकीच्या तोंडावर मते मिळविण्यासाठी, बहिणींना फसविण्यासाठी सरकारने आणली आहे. रवी राणा जे बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातले बोलले , अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? सरकारी पैसा हा रवी राणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  यांचा आहे काय, असा संतप्त सवाल करतानाच, राज्यातील भगिनींचा अपमान करणारी सत्ताधाऱ्यांची भाषा असल्याने सरकारने बहिणींची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.