घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 चोरांना पळवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला. जे राज्य लुटायला निघालेत, राज्यातून सर्व उद्योग गुजरातला नेताहेत, त्यांच्यासोबत समझोता कधीच होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मुंबई तक’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. 2019च्या तुलनेत 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 9 जागाच मिळाल्या. तर दुसरीकडे भाजपच्याही जागा घटून 9 झाल्या. या निवडणूक निकालावर या वेळी आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. इलेक्टोरल बॉन्ड, ईडी, आयटी, सीबीआय, निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असतानाही हा देश कुणाच्या डोक्यात मस्ती जाऊ देत नाही, हे देशातील जनतेने दाखवून दिले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपला जनतेने 303वरून 240वर आणले आणि काही ठिकाणी गडबड झाली नसती तर इंडिया आघाडीचे सरकारही सत्तेवर आले असते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेना हिंदुत्व सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर गेली असा आरोप सातत्याने भाजपकडून केला जातो. या मुद्दय़ावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे आहे, भाजपसारखे घर पेटवणारे नाही, असे स्पष्ट केले. तसेच भाजपला ज्यांच्यासोबत जावे लागले ते जितनराम मांझी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान यांचे पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
केदारनाथमधून 300 किलो सोने गायब झाले त्याचे काय?
वक्फ बोर्ड विधेयकावर देशभरात चर्चा झाली पाहिजे. वक्फ बोर्डाबद्दल बोलतोय, पण केदारनाथमधून 300 किलो सोने गायब झाले आहे त्याचे काय? अयोध्येत जी गळती लागली आहे त्याचे काय? अयोध्येच्या आजूबाजूला लोढांनी हजारो एकर जागा कशासाठी घेतली आहे? लष्कराच्या ट्रेनिंगची जागा डिनोटीफाय करून उद्योगपतींना का दिली गेली? यावर भाजप का बोलत नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकार एकवीरा देवी इथे सोयीसुविधा करत होते, अनेक देवस्थानांमध्ये कामेही सुरू केली होती, त्याला या सरकारने स्थगिती दिली. ही काही धार्मिक कामे नाहीत का, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
वरळीत या आणि लढा
आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढवायला तयार आहेत का? तसे चॅलेंजही तुम्ही दिले होते, या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘मी तर विरोधकांना चॅलेंज दिलेले आहे. वरळीत या आणि लढा.’’ वरळीऐवजी बाजूच्या शिवडी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असे विचारले असता, वाराणसी जर बाजूला असता तर मी नक्की तिथून लढलो असतो. वाराणसी लांब आहे म्हणून वरळी. कारण मी पंतप्रधान नसताना मला तिथून मताधिक्य आहे. त्यामुळे मी वरळीतूनच लढेन, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
वक्फ बोर्डाबद्दल बोलताय, पण केदारनाथमधून 300 किलो सोने गायब झाले आहे त्याचे काय? अयोध्येत जी गळती लागली आहे त्याचे काय? अयोध्येच्या आजूबाजूला लोढांनी हजारो एकर जागा कशासाठी घेतली आहे?