महाराष्ट्र लुटायला बसलेल्यांसोबत समझौता नाहीच… आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

”जे राज्य लुटायला निघाले आहेत. जे राज्यातून सर्व उद्योग गुजरातला नेत आहेत त्यांच्यासोबत काय चर्चा करायची आहे. त्य़ामुळे महाराष्ट्र लुटायला बसलेल्यांसोबत समझौता नाहीच. कधीच नाही’, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदारा आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला फटकारले आहे. मुंबई तकने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही भूमिका मांडली. तसेच घटनाबाह्य मुख्यमंत्री व त्यांच्या चाळीस चोरांना पळवल्याशिवाय मी राहणार नाही, असा निर्धार देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

”लोकसभा निवडणूकीनंतर देशाला वेगळा श्वास मिळाला. लोकांना वाटत होतं की ते संविधान बदलू शकतात. यांनीच संविधानाला बाजूला ठेवून महाराष्ट्रात आपल्या डोक्यावर बेकायदेशीर सरकार बसवलं आहे. हे सगळं होत असताना कमीत कमी देशाने हे दाखवलं की तुमच्या विरुद्ध भाजप उभा असो, सगळ्यात जास्त , इलेक्ट्रोल बॉ्डस असलेला पक्ष उभा असो, ईडी सीबीआय असो तरी देखील आम्ही कुणाच्या डोक्यात मस्ती जाऊ देत नाही. काही ठिकाणी गडबडी झाल्या. या गडबडी नसत्या झाल्या तर इंडिया आघाडीचं सरकार सहा महिन्यानंतर बसणार आहे ते आताच बसलं असतं. चारशे पार जाणार असं जे सांगत होते ते 272 पण घेऊ शकत नाही. ही त्यांची हारच आहे. हा विजय नाही. तो दावा करणाऱ्या नेत्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. आता सध्या मूळ मुद्दा हा आहे की देशात विरोधी पक्ष समोर आहे. गेली दहा वर्ष विरोधी पक्षात आवाज नव्हता. कुठे ना कुठे यात बॅलन्स येणं गरजेचं होतं. प्रत्येक राजकीय पक्षाचा आवाज तिथे ऐकणं गरजेचं असतं. हा देश फक्त दिल्लीतून चालणारा नाहीए. त्यामुळे आता विरोधी पक्षाचा देखील आवाज ऐकला जाणार. भाजपला ज्यांच्यायासोबत जावं लागलं आहे. ते जितनराम मांझी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान यांचे पक्ष कुठे हिंदुत्व वादी पक्ष आहेत का? त्यामुळे भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे आदित्य ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.

”दक्षिण मुंबईत आम्ही चांगल्या फरकाने जिंकलो आहोत. मुंबईत २० मे ला मतदान झालं. तेव्हा आपला मराठी टक्का कुठे होता. हे सुट्ट्यांचे दिवस आहेत. मोठा वर्ग गावी होता. तुम्ही कितीही मतांनी जिंका.जर मताधिक्य पाहायचं असेल तर ते वाराणसीचं पाहावं. स्वत:प्रधानमंत्री बहुमतांचं सरकार चालवत होतं. जेवढं केंद्रीकरण त्यांच्या सत्तेत झालं तेवढं कधीही झालं नव्हते. ते प्रधानमंत्री मतमोजणीत तिनदा पिछाडीवर होते. विश्वगुरु पिछाडीवर का होते, नाराजी का आहे त्यांच्याबद्दल, अयोध्येत ते का हरले हा देखील प्रश्न आहे. वरळी मतदारसंघाचं म्हणाल तर हा मतदारसंघ मी सोडू शकत नाही. तिथे अजून बरंच काम बाकी आहे. आम्ही सरकारमध्ये असताना तिथे वेगाने काम करत होतो. बीडीडीचा पहिला टप्पाचं चावी वाटप लवकरच होईल. जास्तीत जास्त विकासाची कामं पूर्णत्वाला आली आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

वक्फ बोर्डाबाबतच्या भूमिकेविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मी हे नेहमी सांगत राहिन. आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. वक्फ बोर्डाचं बिल त्यांनी संसदेत लपून छपून मांडलं. लेयिंगच्या वेळी सगळ्यांनी बसणं गरजेचं नसतं. आमचं स्पष्ट म्हणनं आहे हे जेपीसीकडे जाऊ दे. त्यावर देशभरात चर्चा चर्चा झाली पाहिजे. वक्फ बोर्डाबद्दल बोलतोय पण केदारनाथ बद्दल काय? स्वत: शं‍कराचार्यांनी सांगितले आहे की तिथलं 300 किलो सोनं गायब झालेलं आहे त्याचं काय? अयोध्येत जी गळती लागली आहे त्याचं काय? अयोध्येच्या आजुबाजुला लोढांनी घेतलेली जी जमीन आहे. त्यांनी जी हजारो एकर जागा घेतली आहे. ती कशासाठी घेतली आहे? वायरमध्ये एक बातमी आली आहे दोन तीन लोकांना आणि अदानी समुहाला तिथे जागा मिळाली आहे ती जागा आर्मी ट्रेनिंगची जागा आहे. ती जागा डीमोटीफाय करून या उद्योजकांना दिली गेली. भाजप केदारनाथ धाम, अयोध्येवर भाजप का बोलत नाहीए. आज सेबीवरचा हिंडेनबर्गचा रिपोर्ट आलाय त्यावरप चर्चा का होत नाही. एकविरा देवी तिथे आमचं सरकार असताना. काही सोयी सुविधा करत होतो, अनेक देवस्थानांमध्ये आम्ही कामं सुरू केलेली त्याला या सरकारने स्थगिती दिली. ही काही धार्मिक कामं नाही का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

”आम्हाला एक लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. राजकीय वाद विवादात आमचे संस्कार बदलत नाही. सगळेच पक्ष निवडणूकीत उतरणार आहेत. भांडणात किती वेळ घालवायचा. वादविवाद व राजकीय गोष्टी होऊ शकतात. पण ही निवडणूक आहे युद्ध नाही. आपण एका राज्यातले आहोत. लढायचं की निवडणूक लढायची हा फरक आपण ओळखला पाहिजे. गेल्या 2 वर्षात जास्तीत जास्त उद्योग गुजरातला गेले आहेत. कारण महाराष्ट्रातले पक्ष एकमेकांना फोडतोय आणि लढत बसतोय. एकमेकांना संपवायला मागे लागले आहेते. निवडणूक ही युद्ध म्हणून लढू नका. ही निवडणूक आहे. आपल्यावर विश्वास ठेवून लोकं मतदान करणार आहोत. त्या विश्वासाला जागलं पाहिजे. दोन वर्षात जी अधिवेशनं झाली त्यात किती वेळा आम्ही भाषण करू शकलो किंवा महाराष्ट्राच्या हिताविषयी भाषण झालं आहे. जो आरडा ओरडा होता, जी चिखलफेक होते. ज्या लेव्हलचं राजकारण आता सुरू आहे. हे सगळं करण्यापेक्षा निवडणूकीसारखं लढा. शा‍ब्दिक वार करा. आपण एकाच राज्यासाठी लढतोय. त्यामुळे कमीतकमी शत्रुत्व ठेवू नका. ‘ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

भाजपविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 2014 ते2019 दरम्यान एक वेगळा भाजप होता. 2014पर्यंत आमची घट्ट मैत्री होती. 2014 ला मैत्री त्यांनी तोडली. त्यानंतर पण आम्ही जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. आताही पारिवारीक मैत्र्या आहेत त्या तशाच आहे. पण आधी जो होता तो वाजपेयींचा भाजप होता. त्यावेळी प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे होते. आज पहिले पाच चेहरे भाजपचे समोर येतात ते इम्पोर्ट केलेले आहेत”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

तुमचं व्हिजन काय आहे याविषयी आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे. धारावीच्या माध्यमातून, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डरच्या माध्यमातून जी लुट सुरू आहे ती थांबवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की पोलीस भरतीसाठी 17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज येतात. त्यांच्या चाचण्या पावसात होतात. या लोकांना काही सोई मिळत नाही. मरीन ड्राईव्हला किंवा जोगेश्वारीच्या पुलाखाली झोपतात ते. यांच्याकडून तुम्ही चोवीस तासाच्या ड्युट्या करून घेणार आहोत. महाराष्ट्रात जे उद्योग येणार होते. हे अनेक उद्योग गुजरातला गेले. मुख्यमंत्री म्हणालेले की याच्यापेक्षा मोठे उद्योग येणार आहेत. काय मिळालं महाराष्ट्राला. दावोसला यांच्या दोन ट्रीप झाल्या. त्यावर 24 तासात 40 कोटी उडवले. आमची श्वेतपत्रिका काढा, आम्ही साडे सहा लाख गुंतवणूक आणली ते दाखवतो आणि तुम्ही यांना विचारा की यांनी काय आणलं दोन वर्षात’

आरक्षणाविषयी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सर्व सामाजिक नेत्याची बैठक व्हायला हवी असे सुचवले. या राज्यकर्त्यांनी सर्व पक्षीयांच्या बैठका बोलवल्या. विधानसभेत आऱक्षणाचा ठराव मांडला. त्याला आम्ही एकमताने मंजूरी दिली., मात्र पुढे जाऊन त्या ठरावावर काहीही झाले नाही. आरक्षणासाठी एक पारदर्शक चर्चा झाली आहे. माझा एक मुलभूत प्रश्न आहे की जरी कुठल्याही समाजाला आऱक्षण दिलं तरी गेल्या दोन वर्षात एक सुद्धा नवा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. त्यामुळे नोकऱ्याच नाहीत. मग हे सरकार आरक्षण कशात देणार आहे. पोलीस भरतीच्या 17 लाख अर्जांमध्ये एमक़ॉम, एएलबी. डबल ग्रॅज्युएट मुलं येत असतील तर आज राज्याची परिस्थिती काय ते विचार करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.