बुडणारा वाचला, वाचवणारे गेले; 5 जिगरी मित्रांचा करुण अंत, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आंधोळीला गेलेले 7 तरुण बुडाल्याची घटना ताजी असताना आता जयपूरमध्येही अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पावसामध्ये बंधाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेले 5 मित्रांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सुट्टीचा दिवस असल्याने सहा मित्र जयपूरजवळील कानोता बंधाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान एक मित्र पाय घसरून खाली पडला आणि बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एकामागोमाग एक पाच मित्रांनी पाण्यात उडी घेतली. त्यांनी बुडणाऱ्या मित्राला तर वाचवले, मात्र यादरम्यान पाचही मित्र बुडाले आणि त्यांचा करुण अंत झाला. धक्कादायक म्हणजे ही घटना घडली त्यावेळी तिथे अन्य काही लोकंही उपस्थित होते. मात्र त्यांनी फक्त व्हिडीओ काढत बघ्याची भूमिका घेतली. यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. सुट्टीनिमित्त कानोता बंधाऱ्यावर गेलेल्या सहा मित्रांपैकी राज बृजवासी नावाचा तरुण पाय घसरून पडला आणि हळूहळू बंधाऱ्याच्या पाण्यात बुडू लागला. हे पाहून राजचे मित्र हर्ष नागौरा, विनय मिणा, विवेक माहौर, अजय माहौर आणि हरकेश मीणआ यांनी पाण्यात उड्या घेतल्या. राज कसाबसा वाचून किनाऱ्यावर आला. मात्र त्याचे इतर मित्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत माहिती देताना एसीपी मुकेश चौधरी म्हणाले की, एकूण 6 तरुण पाण्यात बुडाले. यातील एकाचा जीव वाचला असून 5 जण वाहून गेले. यानंतर एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवले. यावेळी पाचही तरुणांचे मृतदेह हाती लागले.

दरम्यान, सर्व मृत जयपूरच्या शास्त्रीनगर आणि झोटवाडा येथील रहिवासी होते. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सवाई मानसिंह रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजस्थानमध्ये दुर्देवी घटना, आंघोळीसाठी गेलेल्या 7 तरुणांना बुडून मृत्यू