नगर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्येही चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुळा धरणात पाण्याची आवक सुरू असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. 26 टीएमसी एवढी साठवण क्षमता असणारे हे धरण भरल्याने नदीपात्रामध्ये 2 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरण व्यवस्थापनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26 टीएमसी आहे. आजघडीला धरणाच्या जलाशय परिचालन सूची व लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज सोमवारी दुपारी 3 वाजता मुळा धरणातून 2 हजार क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.
दीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित व वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.