विक्रोळी येथील एका उच्चभ्रू इमारतीत चोरीचा प्रयत्न करण्यासाठी गेलेल्या चोराचा पाय घसरून तो खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. अक्षय बाईत असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. विक्रोळी पूर्वच्या कन्नमवार नगर येथे एक 20 मजल्याची इमारत आहे. इमारतीत सुरक्षेसाठी कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात आहेत. आज पहाटेच्या सुमारास अक्षय त्या इमारती आला. तो चोरीचा प्रयत्न करण्यासाठी इमारतीत चढला. त्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. अक्षय खाली पडल्याने आवाज झाला. याची माहिती सुरक्षा रक्षकाने विक्रोळी पोलिसांना दिली. काहीच वेळातच विक्रोळी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अक्षयला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घडल्या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. अक्षय हा नेमका कितव्या मजल्यावरून पडला हे स्पष्ट झालेले नाही. याचा तपास विक्रोळी पोलीस करत आहेत.
बीकेसीत दोन नव्या शैक्षणिक संस्था
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल (एनएमएजेएस) आणि नीता मुकेश अंबानी ज्युनियर स्कूल अर्ली इयर्स कॅम्पस (एनएमएजेएस इवायसी) या दोन शैक्षणिक संस्थांचे नुकतेच उद्घाटन झाले. एनएमएजेएस मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण तर अर्ली इयर्स कॅम्पसमध्ये प्री-स्कूल आणि बालवाडी शिक्षण सुविधा आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 8 – 12 वीपर्यंतच्या शिक्षण आहेच. या तिन्ही संस्थांमध्ये मिळून एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतील. नव्या शाळांची संकल्पना शाळांची संकल्पना ईशा अंबानी-पिरामल यांची आहे. ‘विद्यार्थ्यांच्या विविध गरजा आणि अद्वितीय शिक्षण शैली पूर्ण करू शकणारी संस्था निर्माण करण्याची कल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे. इथे मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार वाढण्यास प्रेरित केले जाईल,’ असे ईशा अंबानी उद्घाटनवेळी म्हणाल्या.
रमेश झवर यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, रोख 11 हजार आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक ‘मराठा’मध्ये काम केलेले झवर हे पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत.
वाडियात मुलांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर
स्वातंत्र्यदिनानिमित्त 13 आणि 14 ऑगस्टला सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परळमधील वाडिया रुग्णालयात मुलांसाठी मोफत हृदयरोग तपासणी आणि उपचारासाठी तज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत लहान मुलांची मोफत 2-डी इको तपासणी, ईसीजी तसेच हृदयविकार आणि उपचाराबाबत मोफत तज्ञांचा सल्ला मिळणार आहे. इकोकार्डिओग्राफी चाचणी ही सर्वात महत्त्वाची समजली जाते. प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराचे निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनाआरोग्य योजनेअंतर्गत आणि विविध ट्रस्टअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्याकरिता पूर्व नोंदणी आवश्यक आहे. संपर्क- प्रीती परदेशी – 8082543996, डॉ. अजय यादव – 8108777700.