माजलेल्या वळूंना कात्रजचा घाट दाखवू, मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

‘‘मुंबईतल्या बऱ्याच जणांना माज आलाय. तो माज उतरवायचे औषध मराठय़ांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रजचा घाट दाखवू, तुमची लेकरं मोठी व्हावीत एवढाच माझा पण आहे. माझा जीव गेला तरी मी मागे हटत नाही,’’ अशा शब्दांत मराठा आरक्षण संघर्ष आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱयांचा समाचार घेतला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यभरात आयोजित केलेल्या ‘जनजागृती व भव्य शांतता रॅली’चे आज पुण्याच्या वेशीवर कात्रजमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी समस्त कात्रज ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील व मराठा बांधवांवर जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते.

या वेळी मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असे ज्यांनी हिणवले त्यांना पुणेकरांनी एकजूट दाखवून दिली. त्यांची पाठ थोपटायला हवी. आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मी हटत नाही, अशीच एकजूट दाखवा. मला यांनी घेरायचं ठरवलं आहे; पण छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ. मुंबईतल्या बऱयाच जणांना माज आलाय तो माज उतरवायचे औषध मराठय़ांजवळ असल्याचेही या वेळी त्यांनी सुनावले.’’

जरांगे-पाटील रुग्णालयात दाखल

पुण्यातील सभेनंतर मनोज जरांगे -पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली असून सभेनंतर त्यांना त्रास सुरू होऊन भोवळ आल्याने त्यांना सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून काही तपासण्यादेखील केल्या आहेत.