शहरातील रस्त्यांच्या तीन वर्षांच्या देखभाल-दुरुस्ती कालावधीतील सर्व ठेकेदारांना महापालिकेच्या वतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांनी खड्डय़ांमुळे चाळण झाली असून, देखभाल-दुरुस्ती कालावधीत असलेले यातील रस्ते तातडीने संबंधित ठेकेदारामार्फत दुरुस्त करून घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर तीन वर्षांच्या कालावधीतील ठेकेदारांना उपशहर अभियंता यांनी नोटीस बजावली आहे.
शहरातील रस्त्यांबाबत महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आयुक्त कार्यालयात शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांची आढावा बैठक घेतली. यावेळी देखभाल-दुरुस्ती व्यतिरिक्त इतर रस्त्यांसाठी तातडीने महापालिकेच्या स्वनिधीमधून 2 कोटींची तरतूद करण्याच्या सूचना मुख्य लेखापाल यांना दिल्या आहेत.
शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. ते तातडीने विभागीय कार्यालयांतर्गत बुजविण्यात यावेत. गणेश उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने पूर्ण करून घ्यावे. हे रस्ते मुदतीत पूर्ण न झाल्यास शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांना जबाबदार धरणार असल्याचे यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. तसेच तीन वर्षांच्या देखभाल- दुरुस्ती कालावधीतील रस्तेसुद्धा मुदतीत पूर्ण करून घ्यावेत. संबंधित ठेकेदारांनी मुदतीत काम न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शंभर कोटींच्या मंजूर रस्त्यांवरील खड्डे संबंधित ठेकेदारामार्फत दुरुस्त करून घ्यावेत. शहरातील इतर रस्ते पॅचवर्क करण्यासाठी तातडीने अल्प मुदतीची निविदा प्रसिद्ध करून प्रत्येक विभागीय कार्यालयात दोन ठेकेदार प्रमाणे आठ ठेकेदारांमार्फत पॅचवर्कची कामे उपशहर अभियंता यांनी करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर. के. पाटील, सतीश फप्पे, कनिष्ठ अभियंता अक्षय अटकर आदी उपस्थित होते.