मित्रांसोबत धबधब्यावर पिकनिकला गेलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. श्याम सुनील जोशी (16) रा. महादेवनगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने श्याम तीन मित्रांसोबत शहरालगतच्या चौसाळा टेकडी परिसरातील किटा कापरा शिवारात गिट्टी खदान जवळ धबधब्यावर पिकनिकला गेला होता.
धबधब्यावर गेल्यावर श्यामने आईला फोन केला. त्यानंतर तो पार्थ योगेश भांदककर व मंदार बोरकर या दोन मित्रांसह डोहात पोहायला उतरला. डोहात उडी घेताच तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. पार्थ आणि मंदार कसेतरी प्रयत्न करुन बाहेर आले. मात्र श्याम बाहेर पडू शकला नाही आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेशला पोहायला येत नसल्याने तो बाहेर थांबला होता.
श्यामला बुडताना पाहून मित्रांनी तातडीने मदतीसाठी आरडाओरडा केला. रविवार असल्याने हा परिसर गजबजला होता. नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र काही साधन नसल्याने तातडीने श्यामला पाण्याबाहेर काढता आले नाही.
या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस व तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना मिळाली. त्यांनी लगेच आपत्ती निवारण कक्षाचे पथक घटनास्थळी पाठवले. या पथकानेही तब्बल तीन तास श्यामचा पाण्यात शोध घेतला. त्यांना मृतदेह मिळाला नाही. अखेर किटा कापरा येथील प्रदीप प्रल्हाद बोरकर हा धाडसी तरुण मदतीला पुढे आला. त्याने स्वतः डोहात उडी घेऊन शोधकार्य सुरू केले. जे प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापन पथकाला जमले नाही, ते काम गावच्या धाडसी युवक प्रदीप बोरकर याने केले. अखेर श्यामचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.