कोलकातामधील आरजी रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. आरोपीची चौकशी, परिस्थितीजन्य पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीला दारु आणि पॉर्नचे व्यसन होते. आधी दारु पित पॉर्न पाहिली. त्यानंतर डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केली.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11 वाजता आरोपी संजय रॉयने रुग्णालयाच्या मागच्या बाजूस बसून दारु पित पॉर्न फिल्म पाहिली. त्यानंतर रुग्णालयाच्या मागच्या दरवाजाने पहाटे 4 वाजता त्याने आत प्रवेश केला. यावेळी जवळपास 5-6 लोक त्या दरवाजातून आत येताना सीसीटीव्हीत दिसून आले. अन्य सर्व लोकांची चौकशी केली असता ते रुग्णालयात दाखल रुग्णांचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले. मात्र आरोपी संजयकडे रुग्णालयात येण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते.
संजय 4 वाजता रुग्णालयात घुसला. त्यानंतर चौथ्या मजल्यावरील सेमिनार रुममध्ये घुसून डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि मग हत्या केली. त्यानंतर 4.45 वाजता तो रुग्णालयातून बाहेर पडला आणि रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बॅरेकमध्ये जाऊन झोपला. पोलिसांनी याच बॅरेकमधून त्याला अटक केली. अटकेच्या वेळीही तो नशेत होता.
आरोपीचे कपडे आणि चप्पल जप्त
आरोपीने पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले आहे. तसेच घटनास्थळावरील रक्ताचे डाग धुवण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी घटनेवेळी आरोपीने घातलेले कपडे आणि रक्ताचे माखलेली चप्पल जप्त केली आहे. आरोपीला गुन्ह्यात आणखी कुणी मदत केली का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.