केरळमधील भूस्खलन घटनेला दहा दिवस उलटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वायनाड दौरा केला. वायनाडला पोहोचल्यानंतर मोदी यांनी भूस्खलन झालेल्या भागाची हवाई पाहणी केली. तसेच भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या पीडित कुटुंबांची भेट घेतली. वायनाडमध्ये झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून वायनाडच्या पीडितांसोबत संपूर्ण देश उभा आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात 400 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. शेकडो लोक जखमी झाले असून अजूनही 170 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम अद्याप सुरू आहे. वायनाडमध्ये आलेल्या संकटावर सर्व जण मिळून मात करू. पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही सर्व जण आहोत. वायनाडला आणखी आर्थिक मदत देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी एका बैठकीत बोलताना दिले. केरळमध्ये भूस्खलनामुळे 81 टन कचरा जमा झाला आहे. याला हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.