सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या कामाचा विचार केला तर कीटक नियंत्रण विभागाचे काम आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने हा विभाग कृषी मंत्रालयापेक्षा आरोग्य मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आणणे गरजेचे आहे. शिवाय परवाना वितरण सुसूत्रीकरण आणि सेवाविषयक सुविधांच्या देशात सुयोग्य, एकसमान वितरण पद्धती आणण्याची गरज असल्याची मागणीही या समिटमध्ये उद्योजकांकडून करण्यात आली.
कीटक नियंत्रण उद्योगातील संस्था इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ एशिया ओशियन पेस्ट मॅनेजर्स असोसिएशन (फाओपमा) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत तीन दिवसीय समिट नुकतीच पार पडली. या समिटमध्ये कीटक व्यवस्थापन व्यावसायिक आणि आशिया व इंडो ओशियन 17 देशांच्या संघटनांचा सहभाग घेतला. या ‘फाओपमा’ पेस्ट समिटमध्ये सुमारे 700 प्रतिनिधी आणि 300 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कीटक व्यवस्थापन पंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये जगभरातील तज्ञ उद्योजकांनी कीटकनाशक विभागासमोरील आव्हाने आणि संधी व सुधारणांबाबत चर्चा केली. कीटकनाशक क्षेत्राचे जनजीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किती महत्त्व आहे, हेदेखील अधोरेखित करण्यात आले. कोविड महामारीच्या काळात याची प्रचीती आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी आयपीसीएचे अध्यक्ष उदय मेनन, उपाध्यक्ष गोपी नायर उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग धिल्लन यांचा सत्कार करण्यात आला.