मुंबई-नाशिक महामार्ग संपूर्णपणे खड्डयात गेलेला आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर पर्यंतच्या रांगा असे चित्र आज या महामार्गावर दिवसभर होते. नाशिक-मुंबई या सुमारे 130 किमी या प्रवासासाठी तब्बल सात तास लागले. या प्रकारामुळे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात अतिशय तीव्र रोष निर्माण झाला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली होती. त्यामध्ये महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले होते. मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील दहा दिवसांत सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही दिले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी केली. खड्डे व वाहतूककोंडीवर सूचना केला. खड्डे बुजवण्याचे काम आधुनिक पद्धतीने करण्याचे आदेश दिले, पण रस्त्यांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. उलट परिस्थिती अधिकच बिघडलेली दिसून येते.
नाशिक-मुंबई हे अंतर सुमारे 130 किमीचे आहे. पण शनिवारी नाशिकहून मुंबई गाठण्यासाठी तब्बल सात तास लागले. या महामार्गावर जागोजागी खड्ड पडले आहेत. काही खड्डे तर दीड ते दोन फुटांपर्यंतचे आहेत. त्यामुळे वाहने अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत होती. परिणामी पाच ते सहा किमी लांबीच्या रांगा लागलेल्या होत्या. वासिंदजवळ पुलाचे काम सुरू आहे, पण कामामध्ये कोणतेही नियोजन नसल्यामुळे या भागात तर अतिशय विदारक चित्र होते. नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यामुळे काही अतिउत्साही वाहन चालकांनी मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या लेनमध्ये वाहने घुसवली. त्यामुळे मुंबई-नाशिक मार्गही ठप्प झाला.
केंद्र सरकारवर रोष
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे अखेरचा टप्पा हा इतरपुरी ते ठाणे जिह्यातील आमणे हा आहे. हा मार्ग सप्टेंबरमध्ये खुला होईल. पण खड्डय़ांची अवस्था अशीच राहिली तर मुंबईतून आमणेपर्यंतच्या समृद्धी महामार्गापर्यंत पोहचण्यास तीन ते चार तास लागतील. वाहतूककोंडी पार केल्यानंतर समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचता येईल. मुलुंडपासून आमणेपर्यंत पोहचण्याच्या मार्गावर तीन पूल आहेत. या तीस किमीपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था आहे. यातील मोठय़ा भागाच्या देखभालीची जबाबदारी पेंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग व राज्य रस्ते विकास महामंडळ समन्वायाने दुरुस्तीची कामे करणार नाही तोपर्यंत समृद्धी महामार्गाचा काही उपयोग होणार नाही.