इस्त्रायलकडून गाझावर सुरु असलेले हल्ले थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. गेल्या 10 महिन्यांपासून इस्त्रायली लष्कराने गाझाला बेजार करुन सोडले आहे. शनिवारी पुन्हा इस्त्रायली लष्कराने गाझा शहरातील एका शाळेवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात सुमारे 100 लोक ठार झाले असून डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती मिळते. गाझा शहरातील अल-ताबीन स्कूलवर हा हल्ला करण्यात आला. इस्त्रायलच्या हल्ल्यावर इराण तीव्र प्रतिक्रिया देत इस्रायल सातत्याने गाझामध्ये नरसंहार करत असल्याचे म्हटले आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी एका निवेदन जारी केले आहे. या निवेदनात गाझावरील हा हल्ला नरसंहार आणि मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इस्त्रायल कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याला किंवा नैतिक तत्त्वांना बांधील नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. इस्रायलचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुस्लिम देशांनी एकत्र येऊन पॅलेस्टिनी राष्ट्राला पाठिंबा देणे, असेही कनानी यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासोबतच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर आयडीएफने याबाबत खुलासा केला आहे. अल-ताबिन स्कूल कॅम्पसमध्ये हमास आणि इस्लामिक जिहादचे 20 दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायली सैन्याने शाळेवर हवाई हल्ला केला. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. यासोबतच आयडीएफने लेबनॉनमध्ये हमासचा वरिष्ठ कमांडर समीर महमूद अल-हजलाही ठार मारले आहे, अशी माहिती आयडीएफने दिली.