डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्याच्या घडीला खड्ड्यात गेला आहे. पुलाचा काही भाग मध्य रेल्वेच्या हद्दीत आहे, तर उर्वरित रस्त्याची जबाबदारी केडीएमसीकडे आहे. मात्र दोन्ही यंत्रणेने खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकली आहे. पुलाच्या 100 मीटरच्या अंतरात 150 हून अधिक खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यातून वाट काढताना डोंबिवलीकरांची हाडे खिळखिळी होत आहेत.
डोंबिवली पूर्व- पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा पूल आहे. 2020 मध्ये रेल्वे आणि केडीएमसीने 12 कोटी खर्च करून पुलाच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले. पुष्पक रेल कन्स्ट्रक्शन कंपनीने हा पूल बांधला. वाहनांची वर्दळ व पावसामुळे या पुलावर खड्डे पडू नये म्हणून रस्ते बांधणी करताना मास्टिक अस्फाल्ट तंत्राचा उपयोग केला होता. मात्र हे मास्टिक अस्फाल्टदेखील कुचकामी ठरले असून पुलावर खड्डे पडले आहेत. यामुळे पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावून येथे वाहनकोंडी होत आहे.
शिवाय कोपर पुलाच्या वळणावर दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास त्यांना टर्न मारण्यास अडथळा येऊनदेखील वाहनकोंडी होत आहे. नवीन पूल बांधून अवघी तीन वर्षे झाली आहेत. मात्र अल्प काळातच पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुलावर एक-दोन नाही तर असंख्य खड्डे पडले आहेत. पूर्व व पश्चिम दिशेला उतारावरदेखील खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे वाहतूककोंडी आणि अपघात वाढले आहेत.
मध्यवर्ती पूल असूनही देखभाल नाही
डोंबिवली पूर्व-पश्चिमेला ये-जा करण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचादेखील पर्याय उपलब्ध आहे. मात्र या पुलाचे ठाकुर्ली दिशेला अर्धवट काम झाले आहे. शहराच्या एका कोपऱ्यात असलेला हा अरुंद पूल अवजड वाहनांसाठी गैरसोयीचा आहे. त्यामुळे या पुलावरून मोठी वाहने फारशी वाहतूक करत नाहीत. शहराच्या बाहेरून येऊन डोंबिवली पश्चिमेला ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना कोपर पूल हा मध्यभागी पडत असल्याने याच पुलाला वाहनचालक प्राधान्य देत आहेत, परंतु हा पूल खड्यात गेल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.