पालघरमध्ये एकाच दिवसात ‘हिट अॅण्ड रन’ने बळी गेल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. मनोरच्या मस्तान रस्त्यावरील गणेश विसर्जन घाटाजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली तर वसईतील नायगावातही भरधाव टेम्पोचालकाने महिलेला चिरडले आहे. या घटनांमध्ये सागर पाटील (27) व मेलबा बेन्स (40) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये तर्राट टेम्पोचालक व कारचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वाड्यातील चांबळे परिसरात राहणारा सागर पाटील हा दुर्वेस गावातील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीमध्ये कामाला होता. ड्युटी संपवून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीने घरी जात होता. त्यावेळी मनोरजवळच्या हात नदी पूल येथील गणेश विसर्जन घाटाच्या वळणावर त्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या धडकेत सागरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातामुळे कारचा पुढचा टायर फुटला. मात्र याही परिस्थितीत कारचालकाने कारसह घटनास्थळावरून पोबारा केला. काही अंतरावर गाडी सोडून त्याने पोबारा केला. याप्रकरणी मनोर पोलिसांनी कारचालक सचिन सुरवसे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो आपल्या मित्रांसोबत मद्यप्राशन केल्यानंतर जेवण करण्यासाठी निघाला होता. मात्र नांदगाव नाका येथे वाहतूककोंडी असल्याने सचिनने विरुद्ध दिशेने कार चालवून दुचाकीला धडक दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी सचिनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चालकाला संतप्त नागरिकांनी पकडून दिले
नायगाव पूर्व येथील सिटीझन बेझी बिल्डिंगमध्ये राहणारी मेलबा मायकल बेन्स ही कार्डिनल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी जात होती. नायगाव पश्चिम उमेळा येथून त्या आपल्या स्कुटीवरून निघाल्या होत्या. यावेळी श्याम पांडे (50) हा टेम्पोचालक टेम्पोमध्ये टोमॅटो भरून नायगावच्या दिशेने निघाला होता. टेम्पोचालक हा दारूच्या नशेत असल्याने त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने मेलबा बेन्स यांच्या स्कुटीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात मेलबा बेन्स यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या टेम्पोचालक पांडेला संतप्त नागरिकांनी पकडून माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.