>> अवंती कारखानीस
हिंदुस्थानी लष्करात महिलांचा सहभाग वाढत असून त्या स्वकर्तृत्वावर मोठमोठी जबाबदारी सांभाळत आहेत. अलीकडेच कर्नाटकच्या म्हैसूरच्या रहिवासी असणाऱ्या सुप्रीता सिटी यांची जगातील सर्वात कठीण युद्धभूमी समजल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशियरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्या त्या आर्मी एअर डिफेन्स कोअरच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. लेह–लडाख येथील सियाचीन काराकोरम पर्वतरांगात सुमारे 20 हजार फूट उंचीवरील क्षेत्राला जगातील सर्वांत कठीण रणभूमी म्हटले जाते. या ठिकाणी शत्रूच्या सैनिकांपेक्षा कडाक्याच्या थंडीचा आणि जीवघेण्या वातावरणाचा सामना करण्याचे आव्हान अधिक बिकट असते. अशा ठिकाणी देशभूमीच्या सेवेसाठी सज्ज राहून सुप्रीती यांनी आदर्श घालून दिला आहे.
अनादी काळापासून स्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा, क्षमतांचा आणि प्रतिभेचा ठसा समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उमटवला असला तरी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या वरचष्म्यामुळे त्या नेहमीच झाकोळल्या गेल्या. तथापि, एकविसाव्या शतकामध्ये महिलांनी उद्योग, शिक्षण, व्यवसाय, माहिती-तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, कला, क्रीडा यांसह सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांना मागे टाकत देदीप्यमान भरारी घेतली आहे. संरक्षणाच्या क्षेत्रातही महिलांनी आपल्यातील क्षमता सिद्ध केल्या आहेत. महिला शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पातळीवर सक्षम व खंबीर असतात. त्या केवळ कुटुंबाची देखभाल करणारी आई, पत्नी किंवा सून म्हणून राहिल्या नाहीत तर हिंदुस्थानी लष्करात दाखल होऊन देश आणि समाजाचे संरक्षण करू शकतात हे महिलांनी दाखवून दिले आहे. अलीकडेच कॅप्टन सुप्रीता सिटी नावाच्या साहसी तरुणीची सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशनल नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सियाचीन भागात तैनात होणाऱ्या आर्मी डिफेन्स एअर कोअरच्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. सियाचीन ग्लेशियरमध्ये नियुक्ती मिळवताना सुप्रीता यांना एक महिन्याच्या कठीण चाचणीतून सामोरे जावे लागले आहे. या चाचणीत बर्फाने तयार केलेल्या भिंतीवर सराव करावा लागला. उणे तापमानात आपला बचाव करत टिकाव धरून राहण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. याचे कारण लेह-लडाख येथे सियाचीन काराकोरम पर्वतरांगात सुमारे 23 हजार फूट उंचीवर असणाऱ्या क्षेत्राला जगातील सर्वात कठीण रणभूमी मानले जाते. या ठिकाणी शत्रूच्या सैनिकांपेक्षा कडाक्याच्या थंडीला आणि जीवघेण्या वातावरणाचा सामना करावा लागतो. रक्त गोठविणारी थंडी 24 तास असते. उणे तापमान, हिमवृष्टी अणि बोचऱ्या वाऱ्यांचा मुकाबला करावा लागतो. काही वेळा पारा उणे 50 अंशांपर्यंत घसरतो.
सियाचीनमध्ये यापूर्वी केवळ पुरुष अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्याची संधी दिली जात होती. पण अलीकडील काळात तेथे महिला अधिकारी अधिकारीदेखील या युद्धभूमीत सेवा देत आहेत. गतवर्षी हिंदुस्थानी सैन्याच्या फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्सच्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांना सियाचीनमध्ये 15,632 फूट उंचीवर कुमार पोस्टवर तैनात करण्यात आले होते. फायर आण्ड फ्युरी कॉर्प्सला 14 वा कॉर्प्स म्हटले जाते. याचे मुख्यालय लेहमध्ये असून ते सैन्याच्या उत्तरी कमांड अंतर्गत येते. याअंतर्गत होणारी नियुक्ती चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर होते. यातील हिंदुस्थानी सैन्य सियाचीन ग्लेशियरचे संरक्षण करतात. जानेवारी 2023 मध्ये सियाचीनमध्ये सेवा दिली आणि त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यानंतर लष्कर मेडिकल कोअरच्या कॅप्टन गीतिका कौल आणि कॅप्टन फातिमा वासीम यांचीही डिसेंबर 2023 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
आता तैनात करण्यात आलेल्या सुप्रीता सिटी या मूळच्या म्हैसूर जिह्यातील रहिवासी आहेत. आठवीला असतानाच त्या एनसीसीत दाखल झाल्या होत्या. त्यांनी प्रारंभिक शिक्षण हुसनूसर येथे शास्त्राr विद्या संस्थेत घेतले आणि त्यानंतर सेंट मेरी कॉन्व्हेंटमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. कृष्णराजसागर येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी म्हैसूरच्या मेरीमल्लप्पा प्री-युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले. जेएसएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांच्याकडे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवीदेखील आहे. शालेय जीवनात तिने अॅथेलिट स्पर्धेत सहभाग घेतला होता. वडील पोलीस निरीक्षक थिरुमलेश आणि आई निर्मला यांना आपली मुलगी न्यायिक सेवेत जाईल, असे वाटत होते. त्यामुळे त्यांचा प्रवेश जेएलएस लॉ कॉलेजमध्ये झाला होता. परंतु प्राचार्य सुरेश यांनी त्यांना हिंदुस्थानी लष्करात रुजू होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे सुप्रीता यांनी महाविद्यालयातही एनसीसीचे प्रशिक्षण सुरूच ठेवले. परिणामी त्यांच्या मनात लष्करात दाखल होण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी पालकाच्या पाठिंब्यावर आपले स्वप्न पूर्ण केले. 2021 मध्ये सुप्रीता सिटींचे लष्करात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. चेन्नईत
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत त्यांनी यासाठीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना लष्कराच्या एअर डिफेन्स कोअरध्ये सेवा देण्यासाठी तयार करण्यात आले. अनंतनाग, लेह यांसारख्या दुर्गम ठिकाणी त्यांनी सेवाही दिली. याकाळात त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच त्यांची आता सियाचीन ग्लेशियरमध्ये नियुक्ती करण्यात आली. जबर इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी देशवासियांचा सन्मान वाढविला आहे.
सियाचीनमध्ये नियुक्ती मिळवणाऱ्यांत कॅप्टन सुप्रीता सिटी यांचे पती जेरी ब्लेझ यांचाही समावेश आहे. ते हिंदुस्थानी लष्करात मेजर पदावर कार्यरत आहेत. मेजर ब्लेज हे तामीळनाडूचे आहेत. मेजर जेरी ब्लेज आणि कॅप्टन सुप्रीता सिटी या दोघांनी 26 जानेवारी 2024 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य संचालनात दोन वेगवेगळ्या तुडकीत सदस्य म्हणून सहभाग घेतला आणि अशा प्रकारचे संचलन करणारी ही पहिलीच जोडी ठरली. आता दुर्गम ठिकाणी नियुक्ती मिळवून कॅप्टन सुप्रीता सिटीने इतिहास घडविला. कॅप्टन सुप्रीता सिटी आणि मेजर जेरी ब्लेज यांचा 2023 मध्ये विवाह झाला. तत्पूर्वी 2016 मध्ये सुप्रीता सिटीने कर्तव्यपथावर एनसीसीच्या तुकडीत संचलनात अणि मेजर ब्लेज यांनी 2014 मध्ये एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभाग घेतला होता. पती ब्लेज यानी जैन विद्यापीठ, बंगळूरू येथून पदवी घेतली. सुप्रीता सिटीने एनसीसीमध्ये मोठे योगदान दिले आहे. म्हैसूर येथे फोर कार एअर स्क्वाड्रन एनसीसीत सहभागी होती. जोधपूर येथे 2015 मध्ये आयोजित अखिल भारतीय हवाई दलाच्या शिबिरातही तिने सहभाग घेतला होता. त्यानंतर दिल्लीत 2016 मध्ये दिल्लीत मुख्य संचलनातही सहभागी झाली होती. सुप्रीता सिटी या लष्कर पोलीस दलातील असून त्यांचे पती मद्रास रेजिमेंटचे आहेत. आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी, प्रेमासाठी एक महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते याचा नवा आदर्श सुप्रीता यांनी घालून दिला आहे.