अभिमानास्पद! गोलरक्षकाचा जयजयकार

द्वारकानाथ संझगिरी 

हिंदुस्थानी संघाने लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवली. आपल्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यात आणखी एका गोष्टीसाठी मला आनंद झाला, ती म्हणजे यशात संघाचा गोलकीपर श्रीजेशचा सर्वात मोठा जयजयकार झाला. तो गोलपोस्टवर जाऊन बसला आणि तिथे संघ जमा झाला. संघाने त्याला अतिशय भावनात्मक, हृद्य असा सेंड ऑफ दिला. 2020 आणि 2024 या दोन्ही जिंकलेल्या कांस्यपदकात श्रीजेशचा वाटा मोठा आहे. संघाला ठाऊक होतं की, त्याने अडवलेल्या गोलची किंमत ही मारले गेलेल्या गोलइतकीच मोठी आहे.

हॉकी हा खेळ मी एखाद दोन वेळाच माझ्या कारकीर्दीत कव्हर केला असेल. माझा या खेळाचा अभ्यास नाही. त्यामुळे हिंदुस्थानच्या विजयाबद्दल, डावपेचाबद्दल मी काही लिहिणार नाही, पण श्रीजेशचं कौतुक पाहताना मन भरून आलं; कारण खूप वर्षांनी एखाद्या गोलकीपरच असं कौतुक मी पाहत होतो. माझं मन थेट लहानपणात लक्ष्मणपर्यंत मागे गेलं. तो 56, 60 आणि 64 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळला होता आणि महान गोलकीपर मानला जात असे. खेळ कुठलाही असो, बचाव करणारा खेळाडू फार फोकसमध्ये नसतो. त्याला फार मोठे वलय नसतं. मग तुम्ही हॉकी घ्या, फुटबॉल किंवा क्रिकेटमधला यष्टिरक्षक. त्यांच्या वाट्याला वेगळं वलय, सर्वात जास्त काwतुक फार कमी वेळा आलेलं आहे. फुटबॉलमध्येसुद्धा सर्वसाधारण माणसाचे हीरो कोण असतात? पेले, मॅराडोना, रोनाल्डो, मेस्सी वगैरे. आपले डोळेसुद्धा गोल करणाऱ्या खेळाडूच्या बरोबरीने फिरत असतात. ते गोलकीपरवर स्थिर होतात ज्यावेळी गोल वाचवायची वेळ येते. पेनल्टी स्ट्रोकच्या वेळी छातीची धडधड वाढलेली असते. यावेळी आपले डोळे श्रीजेशवरसुद्धा स्थिरावले होते. ग्रेट ब्रिटनच्या सामन्यात भारतीय संघाने सामना बरोबरीत सुटेल हे पाहिलं. कारण मग निकाल पेनल्टी स्ट्रोकवर जाणार होता आणि ते अडवण्यात श्रीजेश हा एक्का होता. ते त्यांनी सिद्ध केलं. किंबहुना सामना जिंपून दिला असं म्हणायला लागेल.

क्रिकेट हा आपल्या सर्वांचा लाडका खेळ. किती वेळा आपल्या लाडक्या खेळाडूंमध्ये एखाद्या यष्टिरक्षकाला स्थान असतं? मला दोनच अपवाद दिसतायत. ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि गिलख्रिस्ट. आणि तेसुद्धा केवळ त्याच्या यष्टिरक्षणासाठी नाही, त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी.

माणसाला नेहमीच आक्रमकता भुरळ घालते. बचावाच्या तो चटकन प्रेमात पडत नाही, पण जेव्हा प्राण पंठाशी येतात आणि बचाव केला जातो त्यावेळी बचावाचं महत्त्व कळतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये म्हणूनच आपल्याला श्रीजेशच्या बचावाचं महत्त्व कळलं.

किंबहुना गोलकीपर किंवा यष्टिरक्षकाच्या बाबतीत आपली अपेक्षा असते की, गोलकीपरने प्रत्येक गोल हा रोखलाच पाहिजे आणि यष्टिरक्षकाने प्रत्येक झेल घेतलाच पाहिजे. प्रत्येक यष्टिचीत केलाच पाहिजे. एखादा चांगला झेल किंवा चांगला यष्टिचीत याचं तात्पुरतं कौतुक होतं नाही, असं नाही; पण त्याच्या त्या काwशल्यासाठी तो आपला सचिन, विराट, वॉर्न, बुमरा किंवा अ‍ॅण्डरसन होत नाही.

सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी त्याच्याकडे अशा गौरवाने पाहत नाही.
किंबहुना मोक्याच्या वेळी एखादा झेल सुटला तर तो अजिबात विसरला जात नाही. त्याची आठवण वारंवार काढली जाते. 1990 साली लॉर्ड्सवर इंग्लंडच्या गूचचा झेल किरण मोरेने तो तिशीत असताना सोडला. त्याने त्रिशतक झळकवलं. त्याचं त्रिशतक जेवढं आठवतं तेवढाच तो सुटलेला झेल आठवतो. यष्टिरक्षकाचे हे दुर्दैव आहे आणि तसेच दुर्दैव हॉकी किंवा फुटबॉलमध्ये गोलकीपरच्या वाट्याला येतं.

क्रिकेटचे आणखीन उदाहरण सांगतो

1960 साली कानपूरला आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक कसोटी सामना जिंकला. त्या सामन्यात जसू पटेल या ऑफस्पिनरने पहिल्या डावात नऊ आणि दुसऱ्या नावात पाच विकेट घेऊन तो सामना जिंकून दिला. त्या परफॉर्मन्सवर जसू पटेलला ‘पद्मश्री’ मिळाली; पण त्या सामन्यात नरेंद्र ताम्हाणे यांनी जे यष्टिरक्षण त्या आखाडा खेळपट्टीवर केले होते त्याचं कौतुक झालं नाही. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक म्हणाला, ‘केवळ ताम्हाणे यष्टिरक्षक असल्यामुळे हिंदुस्थानने हा सामना जिंकला. किंबहुना लाला अमरनाथ या निवड समितीच्या सदस्याने ताम्हाणेंना पुढच्या कसोटीतून वगळलं त्याचे अनधिकृत कारण असे दिले जाते की, त्यावेळी लाला अमरनाथ रेल्वेचा रणजी संघ पाहत. त्यांनी ताम्हाणेंना रेल्वेसाठी खेळण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला आणि ते टाटाबरोबरच राहिले. एवढय़ा एका गोष्टीसाठी त्यांनी वगळलं आणि पुंदरनना यष्टिरक्षक केलं. गंमत पहा, पुंदरनकडे त्यावेळेस स्वतःचे ग्लोव्हज्सुद्धा नव्हते. त्यांना ते मोठ्या मनाने नरेन ताम्हाणेंनी दिले.

म्हणूनच एका गोलकीपरला मिळालेला मान खूप भावला. मला एकच उदाहरण आता आठवते की, एकाच वेळेला आपल्याला आक्रमक आणि बचावत्मक फलंदाज आवडत. एक व्हिव रिचर्ड्स, जो आक्रमण करत असे आणि दुसरा गावसकर, जो चार-चार वेगवान गोलंदाजांचेही चेंडूअस्त्रांना माणसाळवत असे. तोफ्याच्या गोळय़ांनी बुरुजावर डोपं आपटलेले पाहताना मजा येते.

श्रीजेशमध्ये मला ते दिसलं

  1. श्रीजेशला कोणीतरी विचारलं, तू इतक्यात का निवृत्त होतोयस? एकेकाळी विजय मर्चंटने सुभाषितासारखं वापरलेलं वाक्य त्याने वापरलं. “you should retire when people ask you why and not why not” तो म्हणाला, 24 वर्षे गोलपोस्ट हे माझं घर होतं. त्याने डोळ्यात तेल घालून अंगावर वेगात मारलेले चेंडू घेऊन, त्यांना चकवत, कधी आक्रमकपणे खेळत आपलं घर लुटलं जाणार नाही हे पाहिलं. आता तो शांतपणे स्वतःच्या राहत्या घरी झोपू शकतो. तो पॅरिसला जाताना त्याच्या बायकोने हॉकी स्टिक आणि बॉल असे सोन्याचे पेंडंट त्याला दिलं होतं. त्याने ते प्रत्येक सामन्यात वापरलं. आता त्या पेंडंटमध्ये बदल करून गोलपोस्टसुद्धा टाकायला हवा. हॉकी स्टिक आणि चेंडूबरोबर गोलपोस्ट हीसुद्धा त्याच्या कर्तृत्वाची खूण आहे.