<<< मंगेश वरवडेकर
चर्चा तर होणारच. व्हायलाही हवी. जर ऑलिम्पिकमध्ये आपण दारिद्र्यरेषेखालील आहोत तर पाकिस्तानला काय म्हणायलं हवं? तिथे तर क्रीडा संस्कृती अजूनही अस्तित्वातच नाहीय. जन्म घेणं तर फार दूरची गोष्ट आहे. किमान आपल्या इथे क्रीडा संस्कृतीने जन्म तरी घेतलाय. तिचं चांगलं पालनपोषण व्हायला अजून काही काळ जाईल.
ऑलिम्पिकच्या तेराव्या दिवशी हिंदुस्थानला सुवर्णपदकाची शेवटची आशा होती. हॉकीने कांस्य जिंकल्यानंतर सर्वांच्या नजरा नीरज चोप्राच्या भाल्याकडे लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने हिंदुस्थानी चाहतेही स्टड दी फ्रान्स म्हणजे ऑलिम्पिक स्टेडियमच्या दिशेने धावली होती.
अनेक अॅथलेटिक्सच्या स्पर्धांच्या गोतावळ्यात भालाफेकही सुरू झाली. एकीकडे लांब उडी सुरू होती. दुसरीकडे महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीची धावाधाव. त्यातच मध्ये पुरुषांची 200 मीटर धावण्याची फायनल आणि सर्वात शेवटी म्हणजे 110 मीटर अडथळा शर्यत. तब्बल 80 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सारा प्रकार सुरू होता. खेळाडू एकाग्रतेने कशी स्पर्धा खेळतात ते देवच जाणे. मिनिटा मिनिटाला आमच्या नजरा वेगवेगळ्या स्पर्धांवर फिरवताना आमचीच दमछाक होत होती.
गतविजेता असल्याने नीरजची दमदार एण्ट्री झाली. मग त्याने भाला फेकायला रनअपही घेतला आणि भालाही फेकला. त्याचा भाला 90 मीटरच्या आसपासच पडला. पण त्याची ती फेक फाऊल ठरली. त्याच्या आधी पाकिस्तानच्या अर्शद नदीमची फेकही फाऊल ठरली होती. मग नदीम आपल्या दुसऱ्या प्रयत्नासाठी झेपावला आणि त्याने केलेल्या फेकीकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले. ती फेक 92.97 मीटर इतकी लांब गेली.
तब्बल 93 मीटर. हा ऑलिम्पिक विक्रमच होता. त्याची ही फेक पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी नदीमच्या कामगिरी उभं राहून मानवंदना दिली. त्याच्या कामगिरीने हिंदुस्थानी प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केलं. स्पर्धेच्या अजून चार फेऱ्या बाकी होत्या. पण नदीमची ही फेकच सुवर्ण जिंकणार, हे तेव्हाच साऱ्यांना कळून चुकलं होतं. त्यानंतर नीरज चोप्रा पुढे सरसावला आणि त्याने 89.45 ही मोसमातली सर्वोत्तम फेक करत हम भी पुछ कम नहीं असल्याचे दाखवून दिले.
नीरजचा आत्मविश्वास पाहून तो आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत हिंदुस्थानला पॅरिसमधील पहिलेवहिले सुवर्ण जिंकून इतिहास घडवेल, असे वाटतं होते. पण नदीमने आपल्या पहिल्याच यशस्वी फेकीत एव्हरेस्ट सर करत पाकिस्तानचा चांदतारा फडकावला. त्याला गाठणे पुणालाही शक्य नव्हते आणि झालेही तसेच. शेवटी तोच सोनेरी क्षणाचा सोबती झाला.
कोणतीही यंत्रणा नसताना पाकिस्तानच्या नदीमने ही ‘सुवर्णफेक’ केली. त्यांच्याकडे तर अॅथलेटिक्स संघटनाच बरखास्त आहे. क्रिकेट सोडलं तर त्यांच्याकडे इतर खेळ कोण खेळतात याची साधी कल्पनाही कुणाला नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांचे पथक केवळ सात खेळाडूंचे होते. यावरून कल्पना येईलच. एक नदीम सोडला तर उर्वरित सहा केवळ हजेरी लावायला आले होते. ते पात्रता फेरीच्या बाहेरच आले नाहीत. पण त्यांनी सात मध्ये एक सुवर्ण जिंकलं जे आपल्या 117 जणांपैकी कुणालाही जमलं नाही. याचे दुःख नक्कीच राहील.
नदीमने ऐतिहासिक विजयानंतर आपले सुवर्ण तमाम पाकिस्तानी अवामला अर्पण केले. जसा जल्लोष आपल्या अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यावर झाला होता, तसाच आता पाकिस्तानाही होईल. त्यांचेही हे वैयक्तिक खेळातील पहिलेच सुवर्ण आहे आणि पहिल्या यशाचे नेहमीच कौतुक होते. नदीमने आपल्या यशात सर्वांना सामावून घेतले असले तरी त्याला दुखापतीत बाहेर काढणाऱ्या डॉ. अली शाह बाजरा यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. नदीमच्या प्रत्येक वाक्यात त्यांचा आवर्जून उल्लेख होता.
नदीमसुद्धा एका सामान्य कुटुंबातच जन्मलाय. त्याच्या घरातही खेळाचे वातावरण होते असे नाही. ऑलिम्पिक स्पर्धेतील इतर पीळदार खेळाडूंसमोर नदीम काहीसा स्थूलच वाटत होता. पण त्याच्या ताकदीने साऱ्यांवर मात केली. नदीमचं यासाठी कौतुक करावं तितकं कमीच असेल. त्याच्या यशानंतर आता आणखी एका खेळात हिंदुस्थान-पाकिस्तानची ठसन होणार, हे पक्के झालेय. दोन्ही देशांचे चाहते एकमेकांना खुन्नस देऊन बघणार हे वेगळे सांगायची गरजच नाही.
आधी हॉकीत राडे असायचेच. क्रिकेटचे युद्ध तर सुरूच आहे. आता भालाफेकीतही तेच रंग भरले जातील. गुरुवारीच त्याची पहिली झलक दिसलीय. स्टेडियममध्ये काही मोजकेच पाकिस्तानी चाहते होते आणि त्यांना नदीमने सुवर्ण जिंकल्याचा जितका आनंद होता, तितकाच आनंद नीरज चोप्राने रौप्य जिंकल्याचा होता. पण त्यांची देहबोली हिंदुस्थानी खेळाडूला हरवून पदक जिंकल्याची होती. हे भाव तर साहजिकच आहेत. यानिमित्ताने दोन्ही देशांत भालाफेकीला चांगले दिवस येतील. आनंदाची गोष्ट म्हणजे भालाफेकीतही हिंदुस्थान-पाकिस्तान द्वंद्व रंगेल. सर्वात महत्त्वाचं काय तर या खेळावर हिंदुस्थान-पाकिस्तानचे राज्य असेल. या द्वंद्वात त्यांनी ते राखावं. तेवढेच समाधान.