सांगलीत कॉलेज कॉर्नर परिसरात महाविद्यालयाच्या दारात पत्नी प्रांजल राजेंद्र काळे (वय 19, रा. वासुंबे, ता. तासगाव) या नवविवाहितेवर कौटुंबिक वादातून पती संग्राम संजय शिंदे (वय 25, रा. सावंतपूर वसाहत, ता. पलूस) याने कोयत्याने खुनी हल्ला केला. हल्ल्यानंतर पती संग्राम शिंदे हा मोपेड, कोयता टाकून पळून गेला. विश्रामबाग पोलिसांत त्याच्याविरुद्ध उशिरा खुनी हल्ला आणि ऍट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्राम शिंदे हा ट्रकचालक म्हणून काम करतो. प्रांजल आणि संग्रामची ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. 3 डिसेंबर 2023 रोजी दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहानंतर प्रांजल तीन महिने सासरी राहिली; परंतु संग्रामच्या घरातील लोकांनी तिला स्वीकारले नाही. त्यामुळे वारंवार वाद व्हायचा. त्यामुळे ती माहेरी येऊन राहिली.
माहेरी राहिल्यानंतर संग्राम तिच्यावर संशय घेऊन त्रास देत होता. संग्राम धमकावत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
प्रांजल ही सांगलीत बी.कॉम.मध्ये शिकत आहे. सकाळी ती बसथांब्यावर उतरून कॉलेजकडे येत होती. त्यावेळी संग्राम मोपेडवरून तिच्या आडवा आला. महाविद्यालयाच्या पश्चिमेकडील गेटच्या बाहेर दोघेजण बोलत थांबले. संग्राम तिला घराकडे चल म्हणून विनंती करत होता. मात्र, प्रांजलने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संग्राम चिडला. त्याने लपवलेला कोयता बाहेर काढला. तेव्हा प्रांजल पळून जाऊ लागली; परंतु त्याने तिला पकडले. झटापटीत ती खाली पडली. तेव्हा त्याने तिच्या डाव्या हातावर वार केला. खोलवर वार झाल्यानंतर प्रांजल मदतीसाठी ओरडू लागली. तेव्हा संग्राम तेथून पळून जाऊ लागला. मोपेड सुरू न झाल्यामुळे जागेवरच सोडून कोयता टाकून पळाला.
हल्ल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली. तेव्हा एका रिक्षा चालकाने प्रांजलला रिक्षात बसवून तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्यानंतर तिला शस्त्रक्रियेसाठी सेवासदनमध्ये दाखल केले. तेथे शस्त्र्ाक्रियेनंतर जबाब नोंदवला. रात्री उशिरा खुनी हल्ला आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत पती संग्राम संजय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.