चंद्रपूर शहरातील उडिया मोहल्ला येथे गणेश गोडाम याची त्याच्याच सख्ख्या भावाने निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी मंगल गोडाम याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील भागात असलेल्या उडिया मोहल्ला येथे गणेश गेडाम हा घरी जेवण करीत होता. त्यावेळी त्याचा भाऊ मंगल पुंडलिक गोडाम घरी आला. मंगल हा दारुच्या नशेत होता, त्याने भावाला शिवीगाळ करीत वाद सुरू केला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि मंगलने कुऱ्हाडीने गणेशच्या गळ्यावर व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात गणेश जमिनीवर कोसळला. रक्तबंबाळ अवस्थेत वार्डातील रहिवाश्यांनी गणेशला रुग्णालयात गेले. मात्र वाटेतच गणेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपी मंगल गोडामला अटक केली. शवविच्छेदनासाठी गणेशचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.