जेवली नाही, झोपली नाही, केस कापले, रक्तही काढलं; पण… कुस्तीवीर विनेश फोगाटचे सुवर्ण स्वप्न भंगले

हिंदुस्थानची दंगल गर्ल, स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाची कुस्ती ‘याचि देही याचि डोळा’ टीव्हीपुढे बसून बघण्यासाठी देशभरातील तमाम कुस्तीपटूंची उत्सुकता टिपेला पोहोचली होती. मात्र 50 किलो वजनी गटातील या फायनलपूर्वी विनेशचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्यामुळे तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविल्याची ब्रेकिंग न्यूज धडकली अन् हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींची घोर निराशा झाली. विनेशच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याच्या स्वप्नांचाही काही क्षणातच चक्काचूर झाला.

मंगळवारी सकाळी विनेश फोगाटचे वजन बरोबर 50 किलोच्या आत होते. या हिंदुस्थानी कुस्तीपटूने तीन कुस्त्या जिंकून ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठून इतिहास घडविला. देशासाठी एक पदक पक्क झाल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण होतं, मात्र मंगळवारी रात्री विनेश फोगाटचं वजन तब्बल दोन किलो जास्त होतं असे वृत्त आहे. तिनं ते वजन कमी करण्यासाठी खूप मेहनतही घेतली. विनेश रात्रभर झोपलीसुद्धा नाही, जेवलीही नाही. वजन कमी करण्यासाठी तिनं सायकलिंग केली, स्किपिंग केली. एवढंच नव्हे तर तिने आपलं रक्तही काढलं, केस अन् नखंही कापले. याचबरोबर सॉना रूममध्येही (पाण्याच्या वाफेची रूम) ती प्रदीर्घ काळ बसली, मात्र एवढं सारं करूनही विनेशचं 100 ग्रॅम वजन जास्तच भरलं. त्यामुळे तिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले.

प्रशिक्षक, आहारतज्ञ काय करत होते?
‘विनेश फोगाटने अतिशय चांगल्या कुस्त्या खेळू न पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती, मात्र दुसऱया दिवशी 100 गॅम वजन अधिक असल्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आलं. पेंद्र सरकाने विनेशला प्रशिक्षक, आहारतज्ञ आणि फिजिओ सर्व काही तिच्या मनासारखं दिलं होतं. हे सर्वजण विनेशबरोबर पॅरिसमध्ये आहेत. विनेशचं वजन वाढलेलं असताना प्रशिक्षक व आहारतज्ञ काय करत होते?’
संजय सिंह (अध्यक्ष, राष्ट्रीय कुस्ती महासंघ)

कुस्तीमधील वजनाचा नियम काय?
ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या स्पर्धा दोन दिवस चालत असतात. त्यामुळे कुस्तीपटूला दोन्ही दिवशी सकाळी वजने द्यावी लागतात. ऑलिम्पिक स्पर्धेच्या नियमानुसार पहिल्या दिवशी वजन देण्यासाठी अर्धा तास वेळ दिला जातो, मात्र दुसऱया दिवशी वजनासाठी केवळ 15 मिनिटे वेळ मिळतो. या वेळेत निर्धारित गटातील वजन भरले नाही तर खेळाडूला स्पर्धेतून अपात्र ठरविले जाते, अशी माहिती अनुभवी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.

विनेश पदकाविना मायदेशी परतणार!
विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आल्याने आता तिला पदकाविनाच मायदेशी परतावे लागणार आहे. आता तिला कुठलंही पदक मिळणार नाही. उपांत्य फेरीत विनेशविरुद्ध हरलेली क्युबाची युस्नेलिस गुझमान ही अंतिम फेरीत अमेरिकेच्या सारा हिल्डब्रॅण्ड हिच्याशी दोन हात करेल. गुझमान अंतिम फेरीत खेळणार असल्याने कांस्यपदकासाठीच्या लढतींतील एक फेरी कमी होईल. अपात्र ठरल्याने विनेश फोगाटला तिच्या 50 किलो गटात अखेरचे स्थान देण्यात आले.

अंतिम पंघालमुळे बदलला वजनी गट
विनेश फोगाट ही 53 किलो गटातील कुस्तीपटू होय. तिने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याच गटातून सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन पदपंही तिने याच गटातून जिंकली होती. मात्र अंतिम पंघालने 53 किलो गटातून हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवून दिल्याने विनेशला ऑलिम्पिकसाठी 50 किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला.

अंतिम पंघाल सलामीलाच गारद
19 वर्षीय अंतिम पंघाल ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलामीलाच गारद झाली. तुकाaच्या झेयनेप येतगीलने तिला हरविले. अंतिमने अवघ्या 79 सेपंदांत 0-10 गुण फरकाने ही लढत गमावली, मात्र तुकाaची कुस्तीपटू दुसऱया फेरीत पराभूत झाल्याने अंतिम पंघालचे रेपेचेज फेरीतून कांस्यपदक जिंकण्याचे स्वप्नही भंगले.

पप्पू यादवही ठरला होता अपात्र
1996च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानचा कुस्तीपटू पप्पू यादवला सामना सुरू होण्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले होते. तो 48 किलो गटातील स्पर्धक होता. चाचणी सामना जिंकल्यानंतर जेव्हा त्याचे वजन मोजले गेले तेव्हा त्याचे वजन जास्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पप्पू यादवला त्या ऑलिम्पिकमध्ये एकही सामना खेळण्याची परवानगी नव्हती.

चक्कर आल्याने विनेश रुग्णालयात
पॅरिस ऑलिम्पिकची फायनल गाठल्यानंतरही अपात्र ठरल्याचे कळल्यानंतर विनेश फोगाट चक्कर येऊन पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत तिचा चेहरा हसरा दिसत असला तरी तिच्या हास्यामागे दडलेलं दुःख व यातना स्पष्ट दिसत आहेत. हिंदुस्थानी ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा तिला धीर देताना दिसत आहेत. यावेळी पी. टी. उषा यांनी विनेशशी सविस्तर चर्चा केली, तिला धीर दिला. ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर विनेश मानसिकरीत्या कोलमडली होती. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, मात्र ती मानसिकरीत्या खूपच निराश आहे. विनेश फोगाटची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती, मात्र या झुंजार कुस्तीपटूची ऑलिम्पिक पदकांची तिची पाटी अद्याप कोरीच आहे. यंदा तिला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, मात्र केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिचे हे स्वप्न भंगले

‘विनेश फोगाटने मंगळवारी तीन कुस्त्या करीत अंतिम फेरी गाठली होती. सलगच्या तीन कुस्त्यांमुळे तिच्या शरीरातील लिक्विड कमी झाले होते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून विनेशला लिक्विड देण्यात आले होते. यामुळे कदाचित वजन वाढले असेल ते दुसऱया दिवशी विनेशला पुन्हा कमी करता आले नसेल, अशी माहिती हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक समितीच्या वैद्यकीय पथकाने दिली.’ .