लोकशाहीत जनता श्रेष्ठ व सर्वात बलवान असते आणि जनतेचे न्यायालयच सर्वोच्च असते, हे लक्षात ठेवा. जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला की काय होते त्याचा अनुभव बांगलादेश घेत आहे, असे नमूद करतानाच बांगलादेशची स्थिती हा सगळय़ांसाठीच इशारा असून त्यातून सर्वांनीच धडा घ्यावा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला.
उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते. बांगलादेशात अराजक माजलेय, हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, जगभरात अनेक देशांत आपण पाहतोय की, जनतेचा संयम सुटत चालला आहे. इस्रायलमध्येही लाखो लोक रस्त्यावर उतरले होते.
पंतप्रधानांना घराबाहेर पडता येत नव्हते. श्रीलंकेतही तसे झाले होते. पाकिस्तानचीही अवस्था आपण पाहतोय. असे अराजक कुठेही होऊ शकते. एकूणच काय तर सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्याने पाहू नये. मग जनतेचे न्यायालय काय असते हे वेळोवेळी दिसून आले आहे आणि बांगलादेशातील जनतेनेही ते दाखवून दिले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदूंवरील अत्याचार थांबवून दाखवा
मला औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणता ना, मग आता हिंमत असेल तर बांगलादेशात जाऊन तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना दिले. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र केला होता. आता शेख हसीना यांना हिंदुस्थानात आश्रय देणाऱ्या मोदी सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे, ती सरकारची जबाबदारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मणिपूरला जात नाही, बांगलादेशात तरी जा, हिंदूंना वाचवा!
मणिपूर पेटलेय, कश्मीरातही हिंदूंवर अत्याचार होताहेत, बांगलादेशातही हिंदूंवर अत्याचार होत असतील तर तातडीने पावले उचलून हिंदूंचे रक्षण केले पाहिजे, अशी आग्रही भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. मोदी-शहा मणिपूरला जात नाहीत, जमले तर त्यांनी बांगलादेशात जाऊन हिंदूंवरचे अत्याचार रोखावेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
…म्हणून आरक्षणावर संसदेत वेळीच निर्णय घ्या!
बांगलादेशातील अराजकामागे आरक्षणाचा मुद्दा असल्याचे माध्यमांनी यावेळी सांगितले असता, तशी परिस्थिती हिंदुस्थानात उद्भवू नये म्हणून आरक्षणाबाबत वेळीच निर्णय घ्यायला हवा आणि तो संसदेच होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जनता सर्वोच्च असते याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी ठेवावी, असेही ते म्हणाले.
टेंडरबाहेरच्या गोष्टी होऊ देणार नाही
दहिसर टोल नाका, मुलुंड टोल नाका, कुर्ला मदर डेअरी यासह अन्य वीस जागा धारावीच्या टेंडरमध्ये नव्हत्या आणि तशी कोणतीही मुभा पंत्राटदारांना देण्यात आली नव्हती. तिथला टीडीआर काढला गेला आहे. तो वापरण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. हे गैर असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अशा टेंडरबाहेरच्या गोष्टी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टेंडरच्या अटीशर्तीमुळे अदानींना जमत नसेल तर अदानींनी तसे सांगावे आणि नव्याने टेंडर काढावे. आतापर्यंत मिठागरांची जमीन वापरली जात नव्हती ती अदानींना दिली जातेय, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. अदानींना वांद्रे रेक्लेमेशन, विमानतळाचा मोठा भूखंड दिला आहे. तिकडे का ट्रान्झिट कॅम्प बांधत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
सांगलीतील खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनीही आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विशाल पाटील महाविकास आघाडीत येणार का असे त्यावरून माध्यमांनी छेडले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, विशाल, विश्वजीत, चंद्रहार पाटील ही तरुण मुले आहेत. चूक झाली तर मनात डूख ठेवणारा मी नाही. त्यावेळी घडायला नको ते घडले. चंद्रहार जिंकला नाही त्याचे शल्य आहेच, पण एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव केला. मागे झालेल्या चुका पुढच्या वाटचालीत होणार नाहीत अशी ग्वाही विशाल पाटील यांनी दिली आणि ते महाविकास आघाडी परिवारात येत असतील तर आम्ही पुढच्या निवडणुकीत एकत्र येणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मिंधे सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’वरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली. 2014 मध्ये प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये पंधरा लाख रुपये येणार होते. त्या पंधरा लाखाचे पंधराशे कसे झाले? बाकीचे शून्य कोणाच्या खिशात गेले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातले उचलून सर्व गुजरातला नेताहेत. महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी म्हणून पंधराशे वाटताय का? महाराष्ट्राची जनता इतकी लाचार नाही. महाराष्ट्र लाचखोर नाही, लाच स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
योजनांचे थोतांड लोकांना कळत नाही का?
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ही योजना पुढे सुरू राहणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘लखपती दीदी’ची योजना होती. ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यानंतर त्याअंतर्गत महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये देणार होतो. आता भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तर साडेआठ हजार का देत नाही? बहिणीला द्या, पण भावांचे काय? जुनी जी योजना आहे कौशल्य विकासाची त्यात स्टायपेंड मिळणार होते तीच आज ‘लाडका भाऊ’ म्हणून आणताय. हे थोतांड लोकांना कळत नाही का? असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केला.
शिवरायांचा महाराष्ट्र लाचारांसमोर झुकला नाही
शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. किती दिवस स्वाभिमानी महाराष्ट्राला तुमच्यावर अवलंबून ठेवणार? महाराष्ट्र त्यांच्या हक्काचे मागतोय. नोकऱ्या मागतोय आणि तुम्ही उद्योगधंदे गुजरातला नेताय आणि भीक दिल्यासारखे पंधराशे रुपये देताय. महाराष्ट्र हे मान्य करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अशा लाचारांसमोर झुकलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
तरच लोकशाही जगेल
आमदार अपात्रतेच्या खटल्याचा निकाल लांबत चालल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. त्याबद्दल बोलताना सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांनी आपल्या जागी बसून बघावे, असे म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,न्यायालयात न्याय मिळेल अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. यात कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. योग्य वेळेत इलाज झाला तरच रुग्ण वाचू शकतो हे सर्वांनी कोरोना काळात पाहिले आहे. सरन्यायाधीशांनीही रुग्णाच्या जागेवर जाऊन बघावे की त्याला औषधाची किती गरज आहे. ते वेळेवर मिळायला हवे. तरच लोकशाही जगेल. नाहीतर जनता न्यायालय आहे आणि ते सर्वोच्च आहे. त्या न्यायालयात शिवसेना जातच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट
उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 सफदरजंग लेन या खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणावरती चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे कामगिरी आणि आगामी विधानसभा निवडणूक या अनुषंगाने उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.
विनेशलाही दहशतवादी म्हटले गेले होते!
दिल्लीत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच विनेशने ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. यासंदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर शरसंधान केले. ते म्हणाले की, विनेशचा आम्हाला गर्व आहे. तिने न्यायासाठी आंदोलन केले होते, तिलाही दहशतवादी बोलले गेले होते. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दहशतवादी बोलले गेले. बांगलादेशातही आंदोलनकर्त्यांना दहशतवादी बोलले गेले होते, रझाकार म्हणूनही आरोप झाले. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती हा हिंदुस्थानला एक इशारा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दिल्ली दौऱ्याबाबत माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो. इंडिया आघाडीचीही बैठक झालेली नाही. सर्व पक्षांचे प्रमुख नेते संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र व अन्य काही राज्यांची निवडणूक होणार आहे. त्यासंदर्भात इंडिया आघाडी म्हणून एकसंधपणाने आपण लढायला हवे आणि एकमेकांचे सहकार्य आपण कसे घेऊ शकतो, यावरही चर्चा होण्याची आवश्यकता आहे. एकमेकांच्या संपर्कात आम्ही आहोतच, पण एकत्र बसून साधकबाधक चर्चाही व्हायला हवी. त्यासाठीच आपण दिल्लीला आलो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडलेले अनेक आमदार उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले असे म्हणतात, असे पत्रकारांनी सांगताच, काहीजण पलीकडे राहून शिवसेनेला मदत करत असतील तर काय हरकत आहे, असे मिश्कील उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
मोदींना योगी नकोत म्हणून यूपीत पॉलिटिक्स
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध राजकारण सुरू आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरले. ते म्हणाले की, वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. मोदींच्या चेहऱ्याने विजय मिळवून न दिल्याने दुसरा कोण अशी चर्चा सध्या भाजपमध्ये सुरू आहे. त्यामुळे आपल्या जागी दुसरा कुणी नको म्हणून योगींना दूर करण्याचे राजकारण सुरू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवराजसिंह यांच्या चेहऱ्यावर तिथे भाजप जिंकली, पण नंतर त्यांना मुख्यमंत्री बनवायचे तर मामा बनवले गेले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नाराजी नको म्हणून नंतर शिवराजसिंह यांना लोकसभेत लढवले गेले आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे तिथे मोठय़ा बहुमताने निवडून आले, असे ते म्हणाले.
गद्दारांना क्षमा नाही
डूख धरणार नाही हे वाक्य शिवसेना सोडलेल्या 40 आमदारांनाही लागू असेल का, असे माध्यमांनी छेडले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी शिवसेना फोडली नव्हती. गद्दारांनी शिवसेना फोडली, चोरली आणि शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्र लुटारूंच्या चरणी वाहून टाकलाय. त्यांना क्षमा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्यातून धडा घ्या. देवापेक्षा कुणीही मोठा नाही. आपण सगळे माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. तेव्हा देव देतो आणि कर्म नेतं, अशी गत होऊ देऊ नका. प्रत्येकाचं कर्म असतं तेच त्याचं भविष्य ठरवत असतं. म्हणूनच आपण देवापेक्षा स्वतःला मोठं समजू नये हाच त्यातला इशारा आहे.
पवारांचा अदानींना पाठिंबा असेल असे वाटत नाही
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवडाभरात ‘वर्षा’ बंगल्यावर दोनदा भेट झाली. त्यावेळी अदानी समूहाचे अधिकारीही उपस्थित होते. धारावी प्रकल्पाच्या अनुषंगाने ती भेट होती अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता, शरद पवार यांचा अदानींना पाठिंबा असेल असे वाटत नाही, ते मुंबईची वाट लावू देणार नाहीत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कुणाची काहीही भूमिका असली तरी धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
मोदीपापांनी बांगलादेशातील अराजक रोखावे
बांगलादेशातील परिस्थिती- बाबत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, त्या बैठकीला पंतप्रधान मोदी हजर नव्हते. त्यांची अजून काहीच प्रतिक्रियाही आलेली नाही. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील तर सर्वपक्षीय बैठक केवळ माहिती देण्यासाठी होती का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. युक्रेन-रशियाचे वॉर मोदी पापांनी रोखले, असे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात, मग त्या पापांनी बांगलादेशातील अराजकही रोखावे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदींवर निशाणा साधला.
मुंबईचा शत्रू तो शिवसेनेचा शत्रू
धारावीकरांचे त्यांच्या रोजगारासह तिथल्या तिथेच पुनर्वसन झाले पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईत एका धारावीच्या 20 धारावी करण्याचा डाव मिंधे सरकारकडून अदानींच्या माध्यमातून सुरू आहे. शिवसेना ते होऊ देणार नाही. कोणीही आले तरी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. धारावीतल्या लोकांना मिठागरात फेकले जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. अदानी हे आपले शत्रू नाहीत, पण मुंबईचा शत्रू तो शिवसेनेचा आणि मुंबईकरांचा शत्रू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.