हिंसाचारग्रस्त बांगलादेशातून पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन पळून आलेल्या शेख हसीना यांचा आणखी किती दिवस हिंदुस्थानात मुक्काम आहे? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. हसीना यांना हिंदुस्थानात कायमचा आश्रय मिळण्याची शक्यता कमी असून, 48 तासांत त्या देश सोडतील. संयुक्त अरब अमिरात (युएई), सौदी अरेबिया किंवा फिनलँडमध्ये त्यांना आश्रय दिला जाईल, असे वृत्त आहे. दरम्यान, नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली उद्या बांगलादेशात अंतरिम सरकारचा शपथविधी होणार आहे.
अंतरिम सरकारसमोर 455 बळी घेणाऱ्या विध्वंसक आणि हिंसक आंदोलकांना शांत करण्याचे मोठे आव्हान असेल. अंतरिम सरकारची धुरा सांभाळण्यासाठी युनुस उत्सुक असून लोकशाही मार्गाने ते बांगलादेशाचे नेतृत्व करतील, असे जनरल वाकेर यांनी सांगितले. लष्कराचे युनूस यांना सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे ते म्हणाले. युनूस गुरुवारी सकाळी पॅरिसमधून दुबईमार्गे ढाक्याला परतत आहेत. दरम्यान, फिनलँडसह इतर काही देशांचा विचार सुरू असला तरी, आम्ही कोणत्याही देशाकडे आश्रय मागितलेला नाही, असे हसीनांचा मुलगा वाजेद जॉय यांचे म्हणणे आहे.
हिंदू जीव मुठीत धरून पलायन करताहेत
बांगलादेशातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर हल्ले वाढले आहेत. हिंदूंची घरे, मंदिरांची तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. आतापर्यंत दोन हिंदूंची हत्या केली. बांगलादेशातील हिंदू भयभीत झाले असून, घरदार सोडून जीव मुठीत धरून सुरक्षित स्थळी पलायन करत आहेत.
आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन
आपण हिंसेचा मार्ग सोडला नाही तर सर्व काही नष्ट होईल, असे सांगत युनुस यांनी आंदोलकांना आता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शूर विद्यार्थ्यांमुळे हा दुसरा विजय दिन उगवला आहे. आता आपल्या सुंदर देशाचे आपण संरक्षण केले पाहिजे. शांत राहा आणि देशाच्या उभारणीसाठी सज्ज व्हा, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनीही देश मुक्त करणाऱ्या तरुणाईला हॉस्पिटलमधून धन्यवाद दिले. आता ‘राग’ किंवा ‘सूड’ नाही तर ‘प्रेम आणि शांती’ने देशाची पुन्हा उभारणी करू. तरुण हेच देशाचे भविष्य आहेत, असे त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. झिया यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
कांद्याचे 80 ट्रक अडकले
बांगलादेशला कांदा घेऊन जाणारे 80 ट्रक प. बंगालमधील चेकपोस्टवर अडकून पडले आहेत. यातील 45 नाशिकचे, 10 महाराष्ट्रातील इतर जिह्यांमधून आणि 25 मध्य प्रदेशातून बांगलादेशला निघाले होते. सोमवारी दुपारी 3 वाजता सीमा बंद झाल्यानंतर अडकून पडलेल्या या प्रत्येक ट्रकमध्ये 25 टन कांदा आहे. सीमा बंद होण्याआधी 50 ट्रक बांगलादेशमध्ये पोहोचले होते.
भारतातही हे घडू शकते… – खुर्शीद
आपल्याकडे वरकरणी सर्व काही सामान्य भासत असले तरी आतून बरीच खदखद आहे. बांगलादेशमध्ये जे घडले ते भारतातही घडू शकते, असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. कश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटते, देशात इतरत्रही तसे वाटू शकते. पण आणखी बरेच काही करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. भारतीय मुस्लिमांविषयीच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
लोकप्रिय अभिनेते आणि निर्माता पितापुत्रांची हत्या
बांगलादेशमधील चित्रपट निर्माते सलीम खान आणि त्यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता शांतो खान यांनाही सोमवारी फरक्काबाद बाजारात जमावाने घेरून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सलीम हे अवामी लीग पक्षाशी संबंधित होते. सलीम हे भारतातील बंगाली चित्रपटसृष्टीशीही संबंधित होते. शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित ‘तुंगीपारर मियाँ भाई’ हा बांगलादेशी चित्रपटही सलीमने दिग्दर्शित केला होता. फरक्काबाद बाजारात संतप्त जमावाने घेरल्यावर त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी गोळीबारही केला. पण जवळच्या बागरा मार्केटमध्ये त्यांना जमावाने घेरले. यानंतर संतप्त जमावाने सलीम आणि त्यांचा मुलगा शांतो यांना बेदम मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला.
आंदोलकांनी बांगलादेशमधील प्रसिद्ध हिंदू गायक राहुल आनंद यांच्या 140 वर्ष जुन्या घराचेही मोठे नुकसान केले आहे. राहुल आनंद यांनी या घरात जतन केलेली जवळपास 3000 पेक्षा जास्त संगीत वाद्ये तोडण्यात आली आहेत.