शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत राज्यामध्ये भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दापोली तालुक्यात भगवा सप्ताहाच्या निमीत्ताने शहरातील नामदेव मंदिरात पदाधिकारी शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांची तोफ या मेळाव्यात चांगलीच धडाडली. त्यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांवर हल्ला चढवत त्यांची चांगलीच पिसे काढली. दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या पर्यटन व्यवसायिकांना अडचणीत आणण्याचे काम रामदास कदम यांनीच केला असल्याचा आरोप करत जो आपल्या भावाचा झाला नाही तो तुमचा होईल का? असा प्रश्न यावेळी संजय कदन यांनी उपस्थित केला. ज्या कुणबी समाजाने ‘कुणबी समाजोन्नती संघ’ या कुणबी समाजाच्या मातृ संस्थेने दापोली शहरात कुणबी भवन उभारण्यासाठी शासकिय जागेची मागणी केली, त्यात आपल्या तालुका प्रमुखामार्फत कुणबी हितवर्धीनीच्या माध्यमातून शासकीय जमिन मिळू नये यासाठी कोलदांडा घातला तो तुमचा होवू शकतो का? असा जळजळीत सवाल उपस्थित करत संजय कदम यांनी कदम पितापुत्रांवर सडकून टीका केली. अखंड शिवसेनेचा नेता म्हणून वावरणारा रामदास कदम आता केवळ दापोली मंडणगड आणि खेड तालुक्याच्या काही भागापुरता मर्यादित राहिला आहे. मातोश्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या गद्दारीमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. असा टोला संजय कदम यांनी लगावला.
तमाम शिवसैनिक हे मातोश्रीला आपले दैवत मानतात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आदेश मानतात, त्यामुळे मातोश्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करून या गद्दारीचा पुरता हिशोब चुकता करू. असे संजय कदम यांनी शिवसैनिकांना ठणकावून सांगितले. संजय कदम यांच्या बेधडक भाषणाला उपस्थित शिवसैनिकांनी सुद्धा दाद देत सभागृह घोषणांनी दणाणून सोडले.
यावेळी दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, सह संपर्क प्रमुख प्रविण लाड, दापोली तालुका संपर्क प्रमुख रविंद्र धाडवे, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, महिला उपजिल्हा संघटिका मानसी विचारे, नगराध्यक्ष ममता मोरे, दापोली शहर प्रमुख आणि नगरसेवक संदिप चव्हाण, आरिफ चिपळूणकर, माजी सभापती चंद्रकांत बैकर, दिनेश मालप, अनंत पाटील, शंकर साळवी, दर्शन महाजन,विभाग प्रमुख तृशांत भाटकर, अमोल नरवणकर, शैलैश पांगत, रमेश बहिरमकर, रविंद्र घडवले, सुर्यकांत म्हसकर, वर्षा शिर्के, अनंत बांद्रे आदिंसह आदिंसह शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.