Dell Technologies या टेक कंपनीने गेल्या 15 महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचारी कपात केल्याचे समोर आले आहे. आता कंपनीने सुमारे 12 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही कपात केल्याचे कंपनीने म्हटले आहे. कामकाज सुव्यवस्थित करणे आणि भविष्यातील वाढीस चालना देणाऱ्या क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य देणे, हे या कपाती मागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आयटी सोल्यूशन्समधील गुंतवणुकीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने कर्मचारी कपात हा व्यापक पुनर्रचनेचा भाग आहे. ग्राहकांसाठी नवीन मूल्ये आणण्याकरीता AI चा वापर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डेलने म्हटले आहे.
ग्लोबल सेल्स अँड कस्टमर ऑपरेशन्सचे अध्यक्ष बिल स्कॅनेल आणि जॉन बायर्न यांनी कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती मेमोद्वारे दिली. या मेमोमध्ये व्यवस्थापनाचा स्तर सुव्यवस्थित करण्याकरीता तसेच भविष्यातील वाढीसाठी कठोर परंतु आवश्यक पाऊले उचलत असल्याचे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांना HR EXIT मीटिंगद्वारे कामावरून कमी केल्याचे सूचित केले गेले.
कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना विभक्त पॅकेज ऑफर केले जाणार आहे. ज्यामध्ये दोन महिन्यांचे वेतन आणि प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी अतिरिक्त आठवड्याचा पगार या स्वरूपात पॅकेज दिले जाणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये इन्सेन्टिव्ह आणि स्टॉक ऑप्शन्सच्या नुकसानीबद्दल असंतोष आहे.
गेल्या दोन वर्षात मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्याचे समोर आले आहे. आयटी क्षेत्रात गेल्या दोन वर्षात दर तासाला 23 कर्मचारी आपली नोकरी गमावत असल्याचे समोर आले आहे. layoff.fyi या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात जगभरातील 2,120 आयटी कंपन्यांनी 4,04,962 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या डेटानुसार गेल्या दोन वर्षांत दररोज सरासरी 555 कर्मचार्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.