जनतेच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्यांनी पाहू नये, नाही तर…; उद्धव ठाकरे यांनी दिला सूचक इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी दिल्लीत दाखल होताच दिल्ली ते देशाच्या गल्ली गल्लीपर्यंत चर्चा सुरू झाली. देशभरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी रांग लावली. उद्धव ठाकरे आपल्या दिल्ली दौऱ्यात माध्यमांशी काय संवाद साधणार याकडे साऱ्यांचं लक्षं होतं. सारी माध्यमं तर्कवितर्क लढवत होती तसतशी देशभरात उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसत होतं. अखेर बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आणि अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

पहिल्या प्रथम त्यांनी आपल्या दिल्ली भेटीचं कारण स्पष्ट केलं. ‘लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही. अधिवेशन सुरू असल्याने INDIA आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. जसजसं जमेल तसतसं INDIA आघाडीतील लोकांना नेत्यांना भेटावं. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर आपण कसं पुढे जाऊ शकतो त्यावर साधक बाधक चर्चा करावी. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि अन्य दोन तीन राज्यांच्या निवडणुकाही होणार आहेत त्याही बाबतीत INDIA आघाडी म्हणून एकसंध पणाने आपण लढायला पाहिजे आणि एकमेकांचं सहकार्य आपण कसं घेऊ शकतो याचीही चर्चा होणे आवश्यक आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बांगलादेशातील परिस्थिती संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ‘जगभर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चालला आहे. इस्रायलच्या जनतेच्या उठावामुळे तिथल्या पंतप्रधानांना बाहेर पडता येत नव्हतं. पाठोपाठ श्रीलंका, बांगलादेशातही हे दिसलं. एकूणच काय तर सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये. तो जर पाहिला तर जनतेचं न्यायालय काय असतं हे बांगलादेशच्या घटनेतून जनतेनं दाखवून दिलं’, अशा सूचक शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना इशारा दिला आहे.