हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक देत इतिहास घडविला. तिने 50 किलो गटाच्या उपांत्य लढतीत क्युबाची मल्ल युस्नेलिस गुझमान हिचा 5-0 गुण फरकाने फडशा पाडत ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे एक पदक पक्के केले. ऑलिम्पिकच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारी विनेश ही पहिली हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू ठरली, हे विशेष.
कुस्तीला प्रारंभ होताच विनेश फोगाटने आक्रमक खेळ करीत वर्चस्व गाजविले. गुझमानच्या बचावात्मक पवित्र्यामुळे तिला गुण मिळविण्यासाठी 30 सेकंदांचा वेळ देण्यात आला. त्यात गुण न मिळविता आल्याने विनेशला गुण बहाल करण्यात आला. पहिल्या फेरीत 1-0 ने आघाडीवर असलेल्या विनेश फोगाटला दुसऱ्या फेरीत 30 सेपंदांत गुण मिळविण्याची ताकीद देण्यात आली. विनेशने गुझमानच्या एकेरी पटात घुसून दुहेरी पटाचा कब्जा घेत 2 गुणांची कमाई करीत आपली आघाडी 3-0 अशी वाढविली.
क्युबाच्या खेळाडूनेही दोन-तीन वेळेस विनेशच्या पटात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र विनेशने तिचा प्रयत्न प्रत्येक वेळी धुडकावून लावला. मग पुन्हा एकदा मोठ्या चपळाईने गुमझानला चितपट करण्याच्या प्रयत्नात विनेशने आणखी 2 गुणांची कमाई करीत आपली आघाडी 5-0 अशी भक्कम केली. शेवटी क्युबाच्या खेळाडूला निष्प्रभ करीत विनेश फोगाटने दिमाखात अंतिम फेरी गाठली.