तब्बल 20 वर्षे पोलिसांना चकमा देणाऱ्या बँक फसवणूक प्रकरणातील आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. व्ही चलपथी राव असे अटक आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे राव याला 2013 मध्ये हैदराबाद न्यायालयाने मृत घोषित केले होते. मात्र सीबीआयने आरोपीचा पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर 20 वर्षांनी सीबीआयला यश आले आणि आरोपी जाळ्यात अडकला.
आरोपी राव हा हैदराबाद येथील एसबीआय शाखेत संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. यादरम्यान त्याने मे 2002 मध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानातील बनावट कोटेशन आणि कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या नावे बनावट सॅलरी स्लिपच्या आधारे 50 लाखांचे कर्ज घेतले होते. या पैशांची त्याने उधळपट्टी केली. त्यानंतर दोन वर्षांनी राव विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले.
जुलै 2004 मध्ये फसवणूक प्रकरणात रावची सहआरोपी असलेल्या त्याच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर सात वर्षांनी राव याला मृत घोषित करण्यासाठी तिने न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने 2013 मध्ये या याचिकेवर सुनावणी करत राव याला मृत घोषित केले.
न्यायालयाने मृत घोषित केल्यानंतरही सीबीआयने आपला तपास थांबवला नाही. तपासादरम्यान राव सालेमला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. राव हा विनिच कुमार नावाने सालेम येथे राहत असून, त्याने 2007 मध्ये दुसरे लग्न केल्याचे पोलिसांना समजले.
सात वर्षे सालेममध्ये राहिल्यानंतर, राव भोपाळला गेला. तिथे त्याने कर्ज वसुली एजंट म्हणून काम केले. त्यानंतर तो उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे स्थलांतरित झाला. 2016 मध्ये त्याने पुन्हा एकदा सीबीआयला चकमा दिला.
यानंतर राव औरंगाबाद येथील आश्रमात स्वामी विधात्मानंद तीर्थ या नावाने राहू लागला. त्याने नवीन नावाचे आधार कार्डही बनवले. येथेही त्याचे कारनामे थांबले नाहीत. आश्रम व्यवस्थापकांची 70 लाख रुपयांची फसवणूक करुन तो 2021 मध्ये तेथून पळून भरतपूर, राजस्थान येथे गेला आणि 8 जुलै 2024 पर्यंत तेथे राहत होता.
सीबीआयने राव याचा आधार तपशील आणि ईमेल आयडी वापरून गुगलच्या कायदा अंमलबजावणी विभागामार्फत त्याचा शोध घेतला. त्यावेळी राव समुद्रमार्गे श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांना कळले. त्यानुसार पोलिसांनी तिरुनेलवेली येथील नरसिंगनाल्लूर गावात त्याचा माग काढत अखेर त्याला अटक केली. रावला न्यायालयात हजर केले असता त्याला 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.