नंग्या तलवारी नाचवत राबोडीत दुकानांची तोडफोड; दोघे जखमी

पाचजणांच्या टोळक्याने भरदिवसा नंग्या तलवारी नाचवत दुकानांची तोडफोड व रहिवाशांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसीम कुरेशी व मौलाअली कुरेशी अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. रविवारी संध्याकाळी या गुंडांनी घातलेल्या राड्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रात्री हल्ला, दहशत माजवणे, परिसरातील वस्तूंचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

वासिम कुरेशी व मौलाअली कुरेशी हे दोघेजण लक्ष्मण पाटील रोडवरील जनता बेकरीजवळ त्यांच्या गप्पा मारत उभे असताना परिसरातील गुंड आरिफ शेख व ख्वाजा शेख या दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र दोघा भावांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेले. मात्र दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरून आरोपी आरिफ व ख्वाजा यांनी आपले साथीदार आदिल शेख, जावेद शेख व राहुल यादव यांच्या मदतीने परिसरात नंग्या तलवारी, चाकू, सुरे व रॉडच्या मदतीने परिसरात दहशत माजवण्यास सुरुवात केली. दरम्यान या पाचही जणांनी वासिम कुरेशी यांच्या तोंडावर, छातीवर व हातावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यांचा भाऊ मौलाअली वाचवण्यासाठी आला असता या हल्लेखोरांनी त्यांच्यावरदेखील वार केले. तसेच परिसरातील दुकानांची तोडफोड केली. या राड्यानंतर गुंडांनी तेथून पोबारा केला.

आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद
डोंबिवली : नोकर बनून घरमालकाला लुटाणारी आंतरराष्ट्रीय टोळी विष्णुनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे. लीलबहादूर कामी, टेकबहादूर शाही आणि मनबहादूर शाही अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही नेपाळचे असून त्यांनी राजू नगर परिसरात असलेल्या धनश्री अपार्टमेंटमध्ये राहणारे कुंदन म्हात्रे यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, 10 विविध कंपन्यांची घड्याळे, भारतीय चलनातील रोख रक्क्म, डॉलर व युरो असा 15 लाख 52 हजार 807 रुपये किमतीचा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी लीलबहादूर कामी याला नवी मुंबईतून तर टेकबहादूर शाही आणि मनबहादूर शाही या दोघांच्या कर्नाटक राज्यातील बँगलोरमधून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 6 लाख 96 हजार 567 रुपये किमतीचा मुद्देमाला जप्त केला आहे.