रामलीला उत्सवाच्या धर्तीवर गणेशोत्सव मंडळांना भाड्यात 50 टक्के सवलत; गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश

मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याने केलेल्या मागणीला यश आले आहे. समन्वय समितीने केलेल्या पाठपुरव्याला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाड्यामध्ये 50% सवलत मिळण्यासाठी समनव्य समितीकडून पाठपुरावा करण्यात आला होता. या मुद्द्याच्या अनुषंगाने महापालिकेने रामलीला उत्सवासाठी जो निर्णय घेतला होता, त्याच धर्तीवर यंदाच्या वर्षीपासून 50 टक्के सवलत गणेशोत्सव मंडळांना देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री गणेश मुर्तीचे मंडपात आगमन 11 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याने आगमन मार्गातील खड्डे बुजवणे, वृक्षाची छाटणी तसेच लटकणारे केबल हे यावर त्वरित कारवाई करून आगमनाला कोणताही अडथळा येणार नाही असा निर्णयही घेण्यात आला. कृत्रिम तलाव वाढविण्याबाबत समन्वय समितीने प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने महापालिकेने गेल्यावर्षीपेक्षा तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी 191 तलाव होते. यंदाच्या वर्षी समन्वय समितीच्या मागणीप्रमाणे 250 इतके कृत्रिम तलाव उपलब्ध होतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवात मोदक, पेढ्या मध्ये वापरण्यात येणारा निकृष्ट दर्जाचा मावा अन्य राज्यातून येत असेल तर त्यावर प्रत्येक महापालिका सार्वजनिक विभागातील आरोग्य खाते लक्ष ठेवतील. मुंबई व उपनगरातील उड्डाणपूल विशेष लालबाग या ठिकाणी लागणारी गळती यामुळे आगमन व विसर्जनात येणारा अडथळा याबाबत समितीने सदरची बाब महानगरपालिकेच्या निदर्शनास आणली. सदर बैठकीत संबंधित अधिकाऱ्याला महापालिका उप आयुक्तांनी निर्देश देऊन ज्या ज्या ठिकाणी अशी गळती ती थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

वरळी लोटस जेट्टी, गेट वे ऑफ इंडिया येथे यंदाच्या वर्षी विसर्जनाबाबत कोणताही अडथळा येऊ नये गतवर्षी विसर्जन बंदीचे निर्देश प्रशासनाकडून निघाले होते लोटस जेट्टि, गेटवे ऑफ इंडिया येथे विसर्जन करण्यास मंजुरी मिळाली होती. यंदाच्या वर्षी याबाबत कोणताही अडथळा येऊ नये अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला महापालिकेने प्रतिसाद देत संबंधित विभागाशी संपर्क साधून यंदाच्या वर्षी दोन्ही ठिकाणी विसर्जनात कोणताही अडथळा येणार नाही व विसर्जन सुरळीत होईल असे आश्वासन दिले.गणेशोत्सव कालावधीत तसेच विसर्जन प्रसंगी पुरुष व स्त्रियांसाठी आवश्यक वाटेल त्या जागी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाईल असे महापालिकेने समन्वय समितीला आश्वासन दिले. गणेशोत्सव मंडळ यांना कापडी, इलेक्ट्रॉनिक जाहिराती बाबतची परवानगी दिली जाईल तसेच जे शुल्क होते ते आकारले जाईल.

या बैठकीला मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर तसेच कार्याध्यक्ष कुंदन आगसकर, प्रमुख कार्यवाह श्री गिरीश वालावलकर तसेच सहकारी गणेश गुप्ता, भूषण मडव, राजू वर्तक, शिवाजी खैरनार, सुरज वालावलकर, संजय शिक्रे, अरुणा हळदणकर, सिंधुताई मांजरेकर, तसेच प्रशासनाच्या वतीने महापालिका उपायुक्त अमित सैनी , गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सकपाळ, मनीष वळंजु संबंधित अधिकारी उपस्थित होते.