माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये रंगला सूर सरगम

माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शारदोत्सवात मुंबईतील विविध शाळांमधील 117 बालगायकांनी सहभाग घेतला. सूर सरगम गायन स्पर्धेत बालगायकांनी अतिशय सुरेल आवाजात गीते सादर केली. सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेने रघुलीला एन्टरप्राइजेस या संस्थेच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली.

प्राथमिक फेरीत निवड झालेल्या प्रत्येक गटातील आठ कलाकारांची गुरुवार, 8 ऑगस्टला होणाऱया अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. तीन गटांत घेतल्या जाणाऱया या स्पर्धेत प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकास 5 हजार, दुसऱया क्रमांकाला 3 हजार तर तिसऱया क्रमांकाला 2 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे परीक्षण गायिका केतकी भावे-जोशी यांच्यासह सृष्टी कुलकर्णी, सोमेश नार्वेकर, हनुमंत रावडे, नचिकेत देसाई, श्रीरंग भावे यांनी केले. शारदोत्सवातील स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित गायकांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल अनेक शाळांनी सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे कौतुक केले.