नाशिक महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर अर्धा एक फूट खोल खड्डे पडले आहेत. हे कमी म्हणून की काय आता कसारा घाट खचू लागला आहे. ठिकठिकाणी दरडी आणि माती ढासळून रस्त्यावर येत आहे. यामुळे संरक्षक जाळ्याही तुटल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. वर्षभरात घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र हा सर्व निधी अधिकारी आणि ठेकेदाराच्या घशात गेल्याने मुंबई- नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांवर मृत्यू दबा धरून असल्याचे भीषण वास्तव आहे.
जूनला पाऊस सुरू होताच मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वेवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी महामार्ग दोन ठिकाणी खचला होता. रस्त्याला महाकाय तडे गेले होते. त्यामुळे महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधींचा ठेका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदाराला दिला. रस्त्याची दुरुस्ती आणि संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या.
दर्जेदार कामे केल्याचा दावा ठेकेदारकंपनीने केला होता. मात्र हा दावा किती पोकळ होता हे आता पाहायला
मिळत आहे. निकृष्ट कामामुळे नवीन रस्ता उखडला आहे. संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. कसारा घाट खचत असून दरडी, माती रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर पाणी तुंबून राहात असल्याने खड्ड्यातून वाहने चलवावी लागत आहेत. कसारा घाटात आठ नागमोडी वळणे आहेत. प्रत्येक वळणावरील संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत, वाहने दरीत कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.
मंत्र्यांना किंमत नाही
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवासकरण्यास मंत्रीसुद्धा तयार नाहीत. वारंवार सांगूनही अधिकारी, ठेकेदार महामार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने दादा भुसे, छगन भुजबळ, अदिती तटकरे आदी मंत्री रस्ते प्रवास टाळून रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत आहेत. दौऱ्यावर येता जाता मंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव, आमदार, खासदार नाशिकमधून मेल एक्स्प्रेस किंवा कसारा रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी लोकल पकडून मुंबई गाठतात.
जीवघेणी ठिकाणे
जुन्या कसारा घाटातील साईबाबा खिंड, आंबा पॉईंट, हिवाळा ब्रिज वळण, त्यापुढील २ किलोमीटरचा रस्ता तसेच नवीन घाटातील बिबलवाडी वळण, ब्रेक फेल पॉईंट, धबधबा पॉईंट, लतीफवाडी उतार, ओहळाची वाडी ही ठिकाणे
धोकादायक आहेत.