बँकेचे कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूकप्रकरणी एकाला गावदेवी पोलिसांनी अटक केली. अली नवाझ खान असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने अटक आरोपीची संख्या दोन झाली आहे. खानला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे व्यावसायिक असून ते गावदेवी परिसरात राहतात. त्याचे एका खासगी बँकेत खाते आहे. मे महिन्यात ते घरी असताना त्याने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली. त्यात बँकेचे कार्ड अपग्रेड करण्याबाबत लिहिले होते. त्याखाली एक नंबर होता. त्या नंबरवर तक्रारदार याने फोन केला. फोन करून तक्रारदार याने बँकेचे कार्ड अपग्रेड करायचे असल्याचे सांगितले. बँकेचे कार्ड अपग्रेड करण्यासाठी एक ॲप्स डाऊनलोड करावे लागेल असे त्याना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने ते ॲप्स डाऊनलोड केले.
ॲप्स डाऊनलोड केल्यानंतर त्याना एक पिन तेथे अपलोड करण्यास सांगितले. तो पिन त्याने तेथे अपलोड केला. त्यानंतर काही वेळाने त्याना मेसेज आला. ते ॲप्स उघडत नाही. त्यासाठी बँकेचे डिटेल्स स्पॅन करून पाठवण्यास सांगितले. त्याने ते कार्ड स्पॅन करून पाठवले. त्यानंतरदेखील ते कार्ड स्पॅन झाले नसल्याचे त्याना सांगितले. त्यामुळे त्याने दुसऱया बँकेचे कार्ड स्पॅन करून पाठवले. कार्ड स्पॅन केल्यानंतर त्याच्या खात्यातून 1 लाख 33 हजार रुपये गेल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने गावदेवी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी शिवाजी नगर येथून मोहम्मद मुस्ताक शहाला ताब्यात घेतले. त्याच्या खात्यात काही पैसे आले होते. पोलिसांनी शहाची चौकशी केली. शहाने त्याचे बँक खाते खानला वापरण्यास दिले होते असे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी गोवंडी परिसरात फिल्डिंग लावली. खान हा रे रोड येथे असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. खानच्या खात्यात आतापर्यंत 11 लाख 44 हजार रुपये आले होते. त्यातील काही रक्कम ही झारखंडच्या जामतारा येथून काढल्याची माहिती तपासात समोर आली आहे.