पुनर्वसनासाठी वायनाडमध्ये टाऊनशिप उभारणार; मृतांचा आकडा 365 वर; 206 बेपत्ता

केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलैला मध्यरात्री अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृत्युमुखी पडणारांचा आकडा 365 वर गेला आहे. यात 30 मुलांचा समावेश असून आज सहाव्या दिवशीही शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, अजूनही 206 जण बेपत्ता आहेत. दरम्यान, भूस्खलनामुळे घरे, जमीन गमावलेल्यांच्या पुनर्वसनासाठी टाऊनशिप बनवणार असल्याची घोषणा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली. याआधी राहुल गांधी आणि कर्नाटक सरकारनेही भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांसाठी 100 घरे बनवण्याची घोषणा केली.

भूस्खलनानंतर उभारण्यात आलेल्या मदत शिबिरांमध्ये चोऱ्या होत असल्याच्या असंख्य तक्रारी आल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. काही लोक रात्रीच्या प्रसंगी येऊन किमती सामान चोरत असून याप्रकरणी पोलिसांत तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंगही सुरू केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर आजच्या सहाव्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. सहा पथकांमध्ये 1264 जणांचा समावेश असून मुंडक्कई, चुरालमाला आणि सामलीमट्टम येथे शोधमोहीम राबवण्यात आली.

बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी रडारची मदत

भूस्खलनामुळे गाडल्या गेलेल्या नागरिकांच्या शोधासाठी रडारची मदत घेण्यात येत आहे. हे रडार जमिनीच्या आत 80 मीटर खोलीपर्यंत जाऊन अडकलेल्या नागरिकांचा शोध घेते. लष्कर या रडाराचा वापर प्रामुख्याने सियाचिन, लडाख या ठिकाणी करते.

मोहनलाल यांच्याकडून 3 कोटी तर चिरंजीव यांची 1 कोटीची मदत

दक्षिणेतील सुपरस्टार मोहनलाल यांच्याकडून भूस्खलनग्रस्त नागरिकांसाठी 3 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर चिरंजीव यांच्याकडून 1 कोटी आणि अल्लु अर्जुन यांच्याकडून 25 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली.

सहा जिह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने केरळमधील कासरगोड, कन्नूर, वायनाड, कोझिकोड, इडुक्की आणि कोट्टायम या सहा जिह्यांसाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भूस्खलनग्रस्त भागाला सहा झोनमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये 40 लोकांची टीम शोधमोहीम राबवत असल्याची माहिती केरळचे मंत्री एके ससींद्रन यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी आज भूस्खलन झालेल्या भागांची पाहणी केली. भूस्खलनाची घटना राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच केंद्राकडूनही मदत जाहीर करण्यात येईल, असे सुरेश गोपी यांनी सांगितले.