पुण्याची तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात थेट 250 फूट दरीत कोसळली. साताऱयातील ठोसेघर सज्जनगड परिसरात असलेल्या बोरडे घाटात ही घटना घडली. पुण्यातून मित्रमैत्रिणींसोबत आलेली तरुणी सज्जनगड आणि ठोसेघर धबधबा येथे पोहोचली. तिथून सर्वजण बोरणे घाटात पोहोचले. तिथे सेल्फी घेत असताना तरुणीचा तोल गेला आणि ती खोल दरीत पडली. त्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी आरडाओरड केली. त्यामुळे स्थानिक नागरिक मदतीला धावले. मात्र दरी खूप खोल असल्याने ट्रेकर्सना मदतीला बोलावण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणीला सुखरूप बाहेर काढले. तिला साताऱयातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.
या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तरुणीचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाली आहे. या भागात पावसाची संततधार सुरू आहे. जमीन निसरडी झाल्याने ही दुर्घटना घडली.