मणिपूरनंतर बांगलादेशातील हिंसाचाराची धग विझण्याचे नावच घेत नाही. सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या एक महिन्यापासून सुरु असलेला हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या संघर्षात 32 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.
बांगलादेशची राजधानी ढाकासह अनेक शहरात हिंसाचाराची नवी लाट उसळली आहे. रविवारी पोलीस, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्ते आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला.
देशातील सध्याची अस्थिर स्थिती लक्षात घेता बांगलादेशातील हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थी एका महिन्याहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. अनेक प्रसंगी हिंसक झालेल्या या आंदोलनात आतापर्यंत देशभरात किमान 200 लोकांचा मृत्यू झाला आहे.