कोपरगावच्या पुरवठा निरीक्षकाला दमदाटी; सरकारी कामात अडथळा, गुन्हा दाखल

पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला मी आणलेली कामे तुम्ही का करत नाही असा सवाल करुन तू येथे नोकरीं कशी करतो तेच बघतो अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल साहेबराव आव्हाड असे आरोपीचे नाव असून पुरवठा निरीक्षक चंद्रकांत नानासाहेब चांडे यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ही घटना शनिवारी 3 ऑगस्टला सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना बाहेरील एजंट चा होत असलेला त्रास चव्हाट्यावर आला आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या संबंधी चंद्रकांत नानासाहेब चांडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी 28 सप्टेंबर 2019 पासून पुरवठा निरीक्षक म्हणून तहसील कार्यालयात कार्यरत आहे. विशाल साहेबराव आव्हाड हा आमच्या खात्यासंदर्भात वेगवेगळी कामे घेवून येत असतो म्हणून माझी ओळख आहे. नेहमी प्रमाणे मी माझ्या कार्यालयात काम करत असताना शनिवारी 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता आव्हाड आला व तो माझ्याशी उद्धट वागला व मला अरेरावी करून तू मी आणलेली कामे का करत नाही म्हणून जाब विचारू लागला. मी त्याला समजावले परंतु तो माझ्या टेबलावर बसून मला दमदाटी करून तू माझी कामे वेळेत झाली पाहिजे नाहीतरी तू येथे कशी नोकरी करतो तेच पहातो ,तुला कामालाच लावतो अशी धमकी देऊन मला शिविगाळ केली व  सरकारी कामात अडथळा आणला. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. मी आव्हाड यास तू टेबलाच्या खाली उतर,मला सरकारी काम करू दे असे समजावले परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी पुरवठा विभागात हजर असलेले प्रविण काजळे, प्रताप फरताळे, सुशील रांजवणे,लामखडे असे तेथे होते त्यांनीही आव्हाड यास समजावले सदर इसम ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ही माहिती मी तहसीलदार यांना दिली आहे. मला शिव्या देवून दमदाटी केली, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून मी आव्हाड यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 221, 352, 351 (2) प्रमाणे फिर्याद दिली या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल कोरेकर पुढील तपास करीत आहेत

चांडे कर्मचारी या विभागात आल्यापासून गोरगरीब लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळवून दिला. खूप तक्रारी कमी झाल्या आहेत. अशा प्रामाणिक चांडे भाऊसाहेबांना जर अशा बाहेरील एजेंट कडून अशी धमकी दिली जात असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो असे लाभार्थी बोलत आहेत.