लक्ष्य सेन सुवर्ण पदकापासून दोन पावले दूर! उपांत्य लढतीत आज डेन्मार्कच्या एक्सेल्सनचे आव्हान

कारकीदीर्तील पहिले ऑलिम्पिक खेळत असलेला हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिसमध्ये उपांत्य फेरी गाठून इतिहास घडविला. ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारा तो हिंदुस्थानचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. मात्र, सुवर्णपदकापासून दोन पावले दूर असलेल्या लक्ष्य सेनपुढे उद्या (दि.4) विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या विक्टर एक्सेल्सनचे कडवे आव्हान असेल.

लक्ष्य सेन रथी-महारथी खेळाडूंना हरवून उपांत्य फेरीत दाखल झालाय. मात्र आता ज्या विक्टर एक्सेल्सनशी लक्ष्यची गाठ पडणार आहे त्या डेन्मार्कच्या खेळाडूने मागील काही वर्षांपासून या हिंदुस्थानी खेळाडूला सातत्याने निप्रभ केलेले आहे. 30 वर्षीय एक्सेल्सनने रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य, तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. शिवाय तो 2017 व 2022 मधील जगज्जेता बॅडमिंटनपटूही आहे. याचबरोबर डिसेंबर 2021 पासून ते जून 2024 पर्यंत हा डेन्मार्कचा खेळाडू जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावरही विराजमान होता.

एक्सेल्सनने हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनला आतापर्यंत सात वेळा हरविले असून सेनने त्याला केवळ एकदा 2022 च्या जर्मन ओपनमध्ये पराभूत केले होते, मात्र पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेनने क्रमवारीत आपल्याहून सरस असलेल्या खेळाडूंना पराभूत केलेले असल्याने त्याचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. त्यामुळे विक्टर एक्सेल्सनला रोखण्यासाठीही लक्ष्य सेन उद्या कोर्टवर जिवाचे रान करतान दिसेल, यात वादच नाही.