गेल्या अनेक दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपूरमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीतील पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. सुरवातीच्या पावसाने आनंदित असलेला शेतकरी आता पाऊस थांबावा अशी प्रार्थना करतो आहे.
शासनाकडून मदत न मिळाल्यास वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील. अशावेळी शेतकऱ्यांकडून टोकाचे पाऊल उचलल्या जाण्याची शक्यता असल्याने, शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी केली आहे. यात प्रामुख्याने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत द्यावी, पावसामुळे हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यातील खचलेले व वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करावे तसेच सततच्या होणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अशा कुटूंबांना शासनाने तत्काळ मदत करावी यासाठी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेवजी गौळकार, शहराध्यक्ष बालु वानखेडे यांच्यासह हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.