केरळच्या वायनाडमध्ये 29 जुलै रोजी भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत मृतांचा आकडा 318 वर पोहोचला असून अजूनही तब्बल 206 बेपत्ता आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून मोबाईल फोनच्या लास्ट लोकेशनवरून मृतांचा शोध घेतला जात असल्याची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बचावकार्यात आज चौथ्या दिवशी एकाच कुटुंबातील चार जणांची जिवंत सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले.
वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये तब्बल चार गावे अक्षरशः वाहून गेली. 29 जुलै रोजी पहाटे 2 ते 30 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मुंडक्काई, चुरामाला, अट्टामला आणि नूलपुझा गावात दरड कोसळली. घरे, पूल, रस्ते, वाहने वाहून गेली. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले. आर्मी, एनडीआरएफसह स्थानिक यंत्रणांकडून वायनाडमध्ये बचावकार्य अजूनही सुरू आहे. यामध्ये मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नुलपुझा गावांमध्ये बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती आर्मीचे अधिकारी कमांडिंग मेजर जनरल वीटी मैथ्यू यांनी सांगितले. आता या ठिकाणी बचावकार्य थांबले असून केवळ मृतांचा शोध सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या दुर्घटनेतील 105 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर वारस नसलेल्या मृतदेहांवर प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जातील. हवामान खात्याने आज (3 ऑगस्ट) येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
9328 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
केरळचे महसूलमंत्री के. राजन यांनी गुरुवारी सांगितले की, आतापर्यंत 9328 लोकांना 91 मदत छावण्यांमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. यापैकी 578 कुटुंबातील 2328 लोक चुरमाला आणि मेप्पडी येथील आहेत. सर्वाधिक विनाश इथेच झाला आहे. लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटाने वायनाडमधील चुरमला ते मुंडक्काईला जोडण्यासाठी 190 फूट लांबीचा बेली ब्रिज बांधला. त्यामुळे मदतकार्याला गती मिळणार आहे.
वायनाडमध्ये काँग्रेस 100 घरे बांधणार
वायनाड दुर्घटनेनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधी दुर्घटनाग्रस्त भागात सातत्याने भेटी देऊन बचावकार्य, मदतकार्याचा आढावा आणि पीडितांची भेट घेत आहेत. मदतकार्यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. मेळपाडीच्या ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळासोबत ते मदतकार्याबाबत चर्चा करणार आहेत. वायनाडमध्ये 100 हून अधिक घरे बांधणार असल्याची घोषणाही राहुल गांधी यांनी केली आहे.
किती लोकांनी आपले कुटुंब आणि घरे गमावली हे पाहून वाईट वाटते. आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू आणि वाचलेल्यांना त्यांचे हक्क मिळतील याची खात्री करू. आज मला माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी जसं वाटत होतं तसंच वाटतंय. ही राष्ट्रीय आपत्तीच आहे.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते