बोनजॉर पॅरिस – बस्स झाले आश्चर्याचे धक्के!

>>मंगेश वरवडेकर

खेळ म्हणजे अनिश्चितता. हीच अनिश्चितता पॅरिसमध्ये दिसतेय. एकाच वेळी आश्चर्याचे अनेक धक्के बसताहेत. ज्यांच्याकडे हमखास पदकाची अपेक्षा बाळगली जात होती त्यांनी निराश केले अन् जो कुणाच्या ध्यानीमनीही नव्हता त्याने आपल्या यशाचा झेंडा रोवलाय. इतिहास असेच घडतात. तो इतिहास गुरुवारी मऱ्हाटमोळ्या महाराष्ट्रवीर स्वप्नील कुसाळेने घडवला. 72 वर्षांचा दुष्काळ या नेमबाजाने एका नेमात संपवला. ऑलिम्पिकनगरीत ‘जय महाराष्ट्र’चा आवाज घुमवला. सोबतीला नेमबाजीचाही आवाज घुमला. आपले 117 खेळाडू ऑलिम्पिकनगरीत आपले क्रीडा कौशल्य पणाला लावताहेत, पण आतापर्यंत नेमबाजांनीच आपली मान अभिमानाने उंचावलीय. बाकीचे मान खाली घालून परतताहेत. मी फार धक्कादायक आहे.

आपले सारेच खेळाडू पदक जिंकण्यासाठी पॅरिसला पोहोचलेत, असे आपण मोठय़ा मनाने जरी बोलत असलो तरी वास्तव वेगळे आहे. आपल्या हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकेच खेळाडू पदकाच्या शर्यतीत होते आणि तेच दावेदार मानले जात होते. या यादीत आपला स्वप्नील कुसाळे कुठेच नव्हता. पण तो पदकासाठी खेळत असल्यामुळे सारेच त्याच्या लढतीकडे एक हिंदुस्थानी म्हणून पाहत होते. त्याचा हा सामना पाहायलाही काही मोजकेच पत्रकारच होते. याचंही कारण तेच, कुणालाही अपेक्षा नव्हती. तसा तो पात्रता फेरीतही सातव्या क्रमांकावर होता आणि या अंतिम सामन्यातही तो त्याच स्थानाच्या आसपास खेळत होता. पण जसजसा नेमबाजीचा खेळ पुढे सरकला, या पठ्ठय़ाने सर्वांना डोळे मोठे करायला भाग पाडले. त्याचा प्रत्येक नेम 10 च्या पुढे गुण मिळवत असल्यामुळे तो चक्क पदकाच्या शर्यतीत पोहोचला आणि अवघ्या हिंदुस्थानींचे लक्ष त्याच्या कामगिरीकडे वेधले गेले. शेवटच्या फेरीत तो आणखी अचूक ठरला असता तर रौप्यही जिंकला असता. असो, त्याने जे जिंकलेय ते सोन्याहून पिवळेच आहे. कांस्य असले तरी ते सोनेरी आहे.

दुसरीकडे बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीची लढत पाहायला हिंदुस्थानी पत्रकारांची तुडुंब गर्दी होती. हे हमखास जिंकून देणार म्हणून सारे धावले होते, पण दोघांनी निराशा केली. ते लढले, पण हरले.  प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेली ही जोडी दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरली. पहिला सेट 21-13 जिंकल्यानंतर ते दुसरा सेटही जिंकून उपांत्य फेरी गाठतील, असे स्वप्न रंगवले होते. पण दुसऱ्या सेटमध्ये मलेशियन जोडीने आपली कमाल दाखवली. रांकीरेड्डी-शेट्टी जोडीच्या छोटय़ा-छोटय़ा चुका वाढतच गेल्या आणि ते हरले. त्यांनी खेळापेक्षा दबावाला मोठे केले आणि ते हरले. हा धक्का बसत नाही तोच गेल्या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधूसुद्धा हरली. तिच्याकडूनही अपेक्षा होत्या, पण तिनेही निव्वळ अपेक्षाभंगच केला. बॉक्सर निकहत झरीनसुद्धा हरली. तिलासुद्धा पदकाच्या शर्यतीत पाहिले जात होते. टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राचेही आव्हान संपुष्टात आले. फक्त धक्केच बसताहेत. पण ते आश्चर्याचे अधिक आहेत. कुसाळेचे पदक आश्चर्य होते तसेच रांकीरेड्डी-शेट्टी , सिंधू, निकहत झरीन, बत्रा यांचं हरणंही आश्चर्यच आहे. पदकांची अपेक्षा यांच्याकडूनच करणार ना. यांनीच मान टाकली तर देशाची मान कोण उंचावणार?

शेवटी खेळ आहे. कुणी जिंकणार, कुणी हरणार. किती दिवस मनाची समजूत काढणार? लढलो आणि हरलो म्हणून कधी खचायचं नसतं, असं आपणच बोलतो. लढणं महत्त्वाचं असतं, पण आपण फक्त लढतोच आहे. आता आपल्याला पदक जिंकण्याचीही सवय करायला हवी. शेवटी जो जिता वही सिपंदर असतो. सिकंदर बना. मी स्वप्नीललाच सिकंदर मानेन. त्याचे पदक हे तमाम हिंदुस्थानींसाठी आश्चर्याचा सुखद धक्काच होता. स्वप्नीलने आम्हाला जो आनंदाचा संस्मरणीय क्षण दिलाय, त्याच्याबद्दल त्याचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. पण पराभवाचे आश्चर्यकारक धक्के सहन होत नाहीत. आता किमान पदकांचे सुखद धक्के हवेत. खूप झाले पराभव. आता आपल्या खेळाडूंच्या यशाची नौका पदकांच्या किनाऱ्यावर लागू देत. हीच ऑलिम्पिकचरणी प्रार्थना.