>> महेश उपदेव
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील संस्थांचे आधारवड, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष तसेच ‘श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक प्रभाकरराव उपाख्य भय्यासाहेब मुंडले यांचे नुकतेच निधन झाले. उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या भय्यासाहेब यांच्या निधनाने नागपूरच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी शोकसंवेदना विदर्भात व्यक्त होत आहे. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले मुंडले हे भय्यासाहेब या नावाने सर्वत्र परिचित होते. सढळ हाताने मदत करणारे म्हणून ते परिचित होते.
प्रभाकरराव मुंडले यांनी 50 वर्षांहून अधिक काळ बांधकाम व्यावसायिक म्हणून काम केले. केवळ या क्षेत्रात नव्हे तर शिक्षणासह विविध क्षेत्रांत त्यांचा राबता होता. 1994 ते 1995 या काळात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष त्यानंतर 2000 ते 2008 या काळात याच संस्थेचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले. याशिवाय राज्य शाखेचे अध्यक्षपददेखील भूषविले. यासोबतच कॉन्ट्रक्टर असोसिएशन ऑफ विदर्भाचे ते अध्यक्ष होते. 1991 ते 1997 या काळात ते विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. 1992 ते 1993 या काळात क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे कोषाध्यक्ष, 1996 मध्ये ते वर्ल्ड कप क्रिकेट ऑर्गनायझिंग कमेटीचे सदस्य होते. व्हीसीए स्टेडियमचे ते शिल्पकार होते, सिव्हील लाइन्समध्ये उभी असलेली स्टेडियमची वास्तू त्यांच्या कारकिर्दीतच उभी झाली. प्रभाकरराव मुंडले व गोपाळराव केळकर या जोडीने विदर्भ क्रिकेटकरिता खूप मेहनत घेतली.
शहरातील 3 महाविद्यालये आणि 9 शाळांचे संचालन करणाऱ्या धरमपेठ शिक्षण संस्थेचे ते 1985 ते 2007 या काळात अध्यक्ष होते. 1989 ते 2007 या काळात ब्लाइंड रिलिफ असोसिएशनचे अध्यक्ष होते. मुंडले एज्युकेशनल ट्रस्टदेखील ते अध्यक्ष होते. 2001 पर्यत ते दीनदयाल रिसर्च इन्स्टिटय़ूट दिल्लीचे अध्यक्ष होते. 1999 ते 2000 या काळात ते ‘तरुण भारत’चे संचालन करणाऱ्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व कायम मार्गदर्शक राहिले. याशिवाय विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)चे उपाध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त तसेच नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनदेखील त्यांनी काम केले. यासोबत इंडियन काँक्रिट असोसिएशन, अमेरिकन काँक्रिट असोसिएशन, इंडियन वॉटर रिसोर्स सोसायटी, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थांचे आजीवन सदस्य तसेच भोसला मिलिटरी स्कूल नाशिकचे पालकत्व त्यांच्याकडे होते.
शैक्षणिक क्षेत्रात आर. एस. मुंडले कॉलेज ऑफ आर्टस्, आर. एस. मुंडले अकॅडमी ऑफ कॉमर्स रिसर्च, मॅनेजमेंट, एम. आर. मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंडले पब्लिक स्कूल, सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस् (सिस्फा), आर. एस. मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल, मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल, स्व. एम. आर. मुंडले प्रायमरी स्कूल, तसेच आऊटवर्ड बाऊण्ड संघटनेशी संलग्न वडगाव येथील साहस कॅम्प व त्याच परिसरातील पसायदान परिसर या विविधांगी संस्थांच्या उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांना नागभूषणसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विविध संस्थांची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांनी अमेरिका, कॅनडा, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, चीन आदी देशांचा दौरा केला. तसेच 1996 साली त्यांनी वर्ल्ड कप क्रिकेटसाठी पाकिस्तानचादेखील दौरा केला. मराठी युवकांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम प्रभाकरराव मुंडले यांनी केले, मराठी तरुण मोठे उद्योजक झाले पाहिजे याकडे त्यांचा कल होता. अनेक संस्थाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांची एक ओळख म्हणजे राज्याचे माजी महाधिवक्ता सुनील मनोहर यांचे ते सासरे होते. एका संवेदनशील व्यक्तीच्या जाण्याने उद्योग, सामाजिक क्षेत्राची हानी झाली आहे. सर्वच क्षेत्रातील कार्यकर्त्यांना त्यांनी नेहमी सहकार्य केले, त्यांच्या दातृत्वाने अनेकांना आधार दिला.