चिल्लर लोकांच्या कशाला, मोठ्या नेत्यांच्या गाड्या फोडा! प्रकाश आंबेडकर यांची चिथावणीखोर भाषा

आमदार जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडण्यापेक्षा शरद पवार, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्या फोडा, अशी चिथावणीखोर भाषा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. गरीब मराठ्यांचे भले करायचे असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत 288 उमेदवार उभे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा गंगाखेडमध्ये दाखल झाली. यानिमित्ताने झालेल्या सभेत बोलताना आंबेडकर यांनी आरक्षणावरून राज्यात मोठा संभ्रम असल्याचे सांगितले. आरक्षणाच्या प्रश्नावर नेमकी एकवाक्यता नाही. आता हा प्रश्न वेगळ्याच मार्गावर चालल्याचे दिसत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. चिल्लर लोकांच्या गाड्या फोडण्यापेक्षा शरद पवार, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्या फोडा, अशी चिथावणीखोर भाषा आंबेडकर यांनी वापरली.

महाराष्ट्रात नात्यागोत्याच्या माध्यमातून 169 मराठा घराणे राज्य करीत आहेत. त्यामुळे गोरगरीब मराठ्यांचे कधीही भले होणार नाही. गरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या सर्व म्हणजे 288 जागांवर उमेदवार उभे करावेत, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. या सभेला रेखा ठाकूर, सुरेश फड, डॉ. सिद्धार्थ भालेराव, अ‍ॅड. अविनाश भोसीकर, गोविंदराव राठोड आदींची उपस्थिती होती.