चला जिंकूया! शिवसेनेचा उद्या पुण्यात शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना आता विधानसभेसाठी सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्ट रोजी पुणे येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होत आहे. त्या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. चला जिंकूया… असा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे.

लोकसभेत बाजी मारली, कोणत्याही परिस्थितीत विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचाच या ईर्षेने राज्यभरातील शिवसैनिक तयारीला लागले आहेत. मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. शनिवारी शिवसंकल्प मेळावा पुण्याच्या स्वारगेट येथील गणेश कला- क्रीडा मंदिरात सकाळी 10 वाजता होणार आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना नेते-खासदार व पुणे जिल्हा संपर्क नेते संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सुषमा अंधारे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, महिला जिल्हा संपर्प संघटक स्नेहल आंबेकर आदींचीही या मेळाव्याला उपस्थिती राहणार असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.