दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाचा आज 40 वा दिवस असून कोतुळ येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज 26 वा दिवस आहे. दीर्घकाळ उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याबद्दल जोवर धोरण घेतले जात नाही, तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व कोतुळ आंदोलकांनी केला आहे.
कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे दुग्धविकास आयुक्त मोहोड साहेब यांनी संगमनेर प्रांत कार्यालयात 26 जुलै 2024 रोजी तीन तास चर्चा केली होती. चर्चेदरम्यान मान्य करण्यात आलेल्या मागण्यांची दुग्धविकास मंत्री यांच्यासोबत चर्चाही झाली होती. सरकारच्या वतीने मान्य करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये काही सकारात्मकता असली तरी दुधाला दीर्घकाळ 40 रुपये दर कसा देता येईल याबाबत पुरेशी स्पष्टता दिसत नाही.
मागील अनुभव पाहता अनुदानाची नाटके दोन-तीन महिने चालतात आणि पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. यावेळीही पुन्हा तसेच होईल अशी रास्त भीती शेतकरी व आंदोलकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे दीर्घकाळ उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याबद्दल जोवर धोरण घेतले जात नाही, तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व कोतुळ आंदोलकांनी केला आहे.