फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरला आहे, संजय राऊत यांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरला आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यात शांतता आणि सुख नांदवायचे असेल तर सत्तांतर घडवून आणावे लागेल असेही राऊत म्हणाले. वेशांतर करून दिल्लीला जाणारे नेते हे हरुन अल रशीदची पोरं आहेत असेही राऊत म्हणाले.

दिल्लीत संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात नाटक, चित्रपट, संगीत, राजकारणाची मोठी परंपरा आहे. मराठी लोक मराठी नाटकांवर आणि परंपरांवर प्रेमही करतात. त्यामुळे आपले जे नवे विष्णूदास आहेत बारामतीचे. विष्णूदास यासाठी म्हणावं लागेल कारण विष्णूचे १३ वे अवतार दिल्लीत आहेत त्यामुळे विष्णूदास. आणि त्यांची जी नाट्यकला समोर आली आहे या अभिनय कलेतलं नेपथ्य, दिग्दर्शन पडद्यामागची पटकथा हे सुद्धा हळूहळू बाहेर येईल. पण महाराष्ट्राने या घडामोडीचा आनंद घेतला पाहिजे. मग एकनाथ शिंदे असतील, त्यांनी मौलवीचा वेश धारण करून दिल्लीत प्रवेश केला होता अनेकदा. आधी अहमद पटेल यांना भेटण्यासाठी त्यानंतर अमित शहांना भेटण्यासाठी. त्यांनी त्या रात्री अनेक वेशांतरं केली होती असं त्यांचीच लोकं सांगत आहेत. छगन भुजबळांनी बेळगावात सीमाभागात लढा होता, त्यासाठी वेशांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते आवडलंही होतं. त्या वेशांतरासाठी भुजबळांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या होत्या, तुरुंगवास भोगला होता. त्यात सुद्धा मियाँ झाले होते. अशा प्रकारे राष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी लोकांनी अशा भुमिका वठवल्या आहेत. पण गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भुमिका वठवल्या आहेत त्यात दाढी मिशा लावून फिरत होते हरुन अल रशीद प्रमाणे. ही सर्व हरुन अल रशीदची पोरं आहेत. हरुन अल रशीद नावाचा एक होता तो असा वेशांतर करुन फिरायचा आणि पहायचा काय चालंलंय ते. त्याच्यामुळे मी काल मागणी केली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकते याचे उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवले आहे असे राऊत म्हणाले.

तुम्ही खोटी नावं, खोटी वेशांतरं खोटे बोर्डिंग पास आणि खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई, दिल्ली सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता. सीआरपीएफची सुरक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अखत्यारित आहे. याचा अर्थ अमित शहांनी सीआरपीएफला कळवलेले आहे की त्यांना सोडा म्हणून. असे कधी दाऊदला सोडले आहे का यापूर्वी? नीरव माल्याला सोडले आहे का विजय माल्ल्याला सोडले आहे का? मेहुल चोक्सी, टायगर मेमनन, छोटा शकीलला सोडले आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला.

हा आता अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे. सीआरपीएफच्या कमांडरला मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळावर केंद्राच्या गृहखाताच्या सूचना असल्याशिवाय ही वेशांतरं बनावट बोर्डिंग पास खोट्या नावाची हे व्यक्ती जाऊच शकत नाही. आमच्यासारख्या खासदारांना मंत्र्यांना अडवलेलं आम्ही पाहिलंय. मग ज्या अर्थाने हे तीन चार लोकं सातत्याने मुल्ला मौलवीची वेशांतरं करून खोट्या नावाने जात होते. खोटे पॅन कार्ड बनवले गेले, खोटे आधारकार्ड बनवले गेले. आणि त्यांना तिथून सुरक्षेत स्थळी जाता यावं म्हणून दिल्लीच्या खास सूचना असायलाच हव्यात असेही राऊत म्हणाले.

सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे. अजित पवारांना अडचणीत आणण्याचे काम या फिरत्या रंगमंचाने केले आहे. काही गोष्टी गोपनीय असतात, चोरांनी चोरासारखं वागावं. ज्याने गुन्हा केला आहे त्यांनी कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भुमिका आहे. जे गद्दार आणि बेईमान आहेत त्यांनी उगाच स्वाभिमानाचा आव आणून फिरलात तर तुम्ही अडचणीत याल आणि आलेले आहात. माझी मागणी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे. डोवाल ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात. अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना अजित डोवाल काय करत होते? ते जेम्स बॉण्ड आहेत ना? मग जेम्स बॉण्डला हे कळालं नाही का की मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळाची सुरक्षा धोक्यात आली आहे हे जेम्स बॉण्डला कळाले पाहिजे. जेम्स बॉण्डला हे का कळाले नाही. या जेम्स बॉण्डच्या अनेक कथा आणि दंतकथा आम्ही वाचतो. मग झालं काय? असे राऊत म्हणाले.

मातोश्रीवर मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन झाले यावर राऊत म्हणाले की ही भाजपची कारस्थानं असतात. याला राजकारणातला फडणवीस टच म्हणतात. जोपर्यंत फडणवीस महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती मिळणार नाही. जर महाराष्ट्रात सुख आणि शांततेत नांदवायची असेल तर आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल. आणि हा जो कचरा आहे, या सगळ्यांना यांनी केलेल्या गंभीर आर्थिक गुन्ह्याबद्दल आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील असेही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरला आहे अशी टीका राऊत यांनी केली. तसेच या राज्याची संस्कार, संस्कृती, अभिरुची ही आम्ही अनुभवली आहे. अनेक वर्ष राजकारण विद्यार्थी म्हणत पाहत होतो. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून पाहत आलो आणि त्यात प्रत्यक्ष त्यात सहभागी झाली आहोत. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतगदादा पाटील, विलासराव देशमुख, बॅरिस्टर अंतुले साहेब, मनोहर जोशी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणामध्ये दर्जा राखला . पण मोदी शहांच्या डर्टी पॉलिटिक्समुळे महाराष्ट्रात डर्टी राजकारण्यांना सत्तेत बसवलं त्यामुळे राज्यात भाषेचा, संस्कृतीचा दर्जा घसरत गेला. महाराष्ट्रात विषाचे प्रवाह निर्माण करण्यात भारतीय जनता पक्षाच्या या दोन चार नेत्यांचा फार मोठा सहभाग आहे. आणि राज्याच्या राजकारणात या नेत्यांची नावं काळ्याकुट्ट शाईने लिहली जातील असेही राऊत म्हणाले.