मुदतपूर्व जन्मलेल्या बालकाचा दोन दिवसांनंतर मृत्यू झाला. मात्र, प्रसूतीनंतर बाळ रडले नाही, त्याचा श्वास नव्हता, हृदयाचे ठोके लागत नव्हते. या कारणांमुळे तत्पूर्वीच या बाळाला मृत घोषित करून त्याचा स्मशान दाखला तयार करण्याचा प्रकार महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उघडकीस आला आहे.
दिघी येथील 23 वर्षीय महिलेला मंगळवारी (23 जुलै) वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी तिच्या सोनोग्राफीच्या अहवालात गर्भाला रक्तपुरवठा बंद असल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत प्रसूती करणे आवश्यक होते. तसेच प्रसूतीदरम्यान अथवा प्रसूतीनंतर बाळ दगावण्याचे प्रमाण अधिक असते. योग्य ते उपचार करूनही बाळ कमी दिवसांचे व कमी वजनाचे असल्यामुळे ते वाचण्याची शक्यता कमी असल्याची पूर्वकल्पना त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली होती.
बाळाचे वजन 600 ग्रॅम होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर ते रडले नाही. त्याचा श्वास नव्हता. हृदयाचे ठोके लागत नव्हते. प्राथमिक दृष्टिकोनातून गर्भ हा उपजत मृत असल्याचे जाणवत होते. सस्पेंडेड अॅनिमेशनच्या स्थितीमध्ये अशी लक्षणे दिसू लागतात. या स्थितीमध्ये तपासणीदरम्यान बाळाचे ठोके व श्वसनप्रक्रिया काही काळ बंद असते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. एका तासानंतर बाळाला उचलल्यावर त्याच्या हाताची हालचाल जाणवली. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. पुढील 48 तासांनंतर म्हणजे गुरुवारी (25 जून) रात्री बाळाचा मृत्यू झाला.
मुदतपूर्व जन्मलेले हे 30 आठवड्यांचे बाळ मृत होईल किंवा जिवंतही राहील, याबाबत महिलेच्या पतीला पूर्वकल्पना दिली होती. बाळाच्या सस्पेंडेड अॅनिमेशनच्या स्थितीमुळे त्याचा मृत्यू झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. तथापि, हालचाल जाणवल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. यादरम्यान कर्मचाऱ्यांची शिफ्ट बदलल्याने दोन विभागांमधील कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ राहिला नाही. त्यामुळे स्मशान दाखला तयार केला. या प्रकाराची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय