‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीत सध्या ‘वर्षा पर्याटना’ला बहर आला आहे. पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावरील भिलार वॉटर फॉल्स व प्रसिद्ध लिंगमळा धबधबा दाट धुक्यात ओसंडून वाहत आहे. या धबधब्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या काही वर्षापासून येथे वर्षा पर्यटनाची क्रेझ पहायला मिळत आहे.
नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा लेक दाट धुक्यात हरवला आहे. सध्या बोटिंग बंद असले तरी तुडुंब भरलेल्या वेण्णा लेकसह क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, तसेच विविध पॉइंट्सवर पर्यटकांची रेलचेल आहे. पर्यटकांचे माहेरघर असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची रेलचेल आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वरचे रूप पूर्णपणे पालटले असून, डोंगरकपारीतून उंचावरून कोसळणारे धबधबे आणि सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. या सुखद व रम्य वातावरणाची मजा लुटण्यासोबतच पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
आशिया खंडातील सगळ्यात मोठे असणारे पठार टेबल लॅण्डवर देखील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. टेबल लॅण्डवर रिपरिप पडणारा पाऊस अंगावर घेत पर्यटक या वर्षा पर्यटनाची चांगलीच मजा लुटताना दिसत आहेत.
पाऊस व दाट धुक्यात पाचगणीतला सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट येथे अनेक हौशी पर्यटक घोडेसवारी करताना दिसत आहेत. धुंद वातावरणात खवय्ये पर्यटक गरमागरम मका पकोडा, कांदाभजी, मकाकणीस, आलेदार चहासह गरमागरम मॅगीचा आस्वाद घेताना आहेत. मुख्य बाजारपेठेत गरमागरम चणे, चिक्की फजसोबतच ऊबदार ब्लँकेट्स, कानटोपी, मफलर, येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदीसाठी पर्यटकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत.
वर्षा पर्यटनासाठी गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटक गर्दी करत आहेत. यावर्षी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असून, निसर्गसौंदर्य खुलले आहे. तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यटकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकही वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. यंदा येथील पावसाचा आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे, असे हॉटेल ‘रेन फॉरेस्ट’चे मालक राजेंद्र पार्टे यांनी सांगितले.